Nitish Kumar ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हेच नितीश कुमार आता वेगळ्या विचारात असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. आपल्याला इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून घोषित करावं, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडून केली जात होती. मात्र पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात असून ते इंडिया आघाडीपासून वेगळं होण्याचीही भूमिका घेऊ शकतात.
नितीश कुमार हे अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात सतत बदललेल्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाऊ लागले आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला सोबत घेत त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे.
२९ तारीख ठरणार महत्त्वाची!
नितीश कुमार यांच्या आगामी डावपेचांच्या दृष्टीने २९ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कारण २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या जेडीयूचे अध्यक्ष असलेले ललन सिंह हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. कारण ललन सिंह यांच्या पुढाकारानेच मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याने ललन सिंह हे काहीसे नाराज झाले असून ते अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊ शकतात.
जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?
'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.