पटणा – बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत नाराज झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिथून लवकर निघून आले. नितीश कुमार यांना नव्या INDIA आघाडीचे संयोजक न बनवल्याने नाराज आहेत. त्यामुळेच ते बंगळुरूच्या बैठकीतून लवकर बाहेर पडले असा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच बंगळुरूत दोन दिवसीय विरोधी पक्षाच्या महाबैठकीचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले. १७-१८ जुलैला ही बैठक बंगळुरूत पार पडली. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही तर २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या या आघाडीला INDIA म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलेपमेंट इंक्लूसिव्ह अलायन्स असं नाव देण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेतून नितीश कुमार गायब
बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात नितीश कुमार गायब होते. बैठकीतून निघून ते पटणासाठी रवाना झाले. नितीश कुमार नाराज होऊन बैठकीतून निघाले त्यामुळे पत्रकार परिषदेला थांबले नाहीत असा दावा भाजपाने केला आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी त्यांची मते मांडली.
भाजपा खासदार सुशील कुमार मोदी ट्विट करून म्हटलं की, नितीश आणि लालू प्रसाद यादव विरोधकांच्या पत्रकार परिषदेत न थांबता का निघून आले? INDIA चे संयोजक न बनवल्याने ते नाराज तर नाहीत ना...तर बिहारच्या महाआघाडीतील मोठे नेते बंगळुरूतून निघून आले असं केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ट्विटरमधून सांगितले. विरोधी पक्षाच्या बैठकीआधी बंगळुरूत नितीश कुमार यांच्याविरोधात पोस्टरबाजी झाली. त्यात बिहारमध्ये कोसळलेल्या ब्रीजचा उल्लेख होता. नितीश कुमार हे अनस्टेबल प्राइमिनिस्ट्रियल कंटेडर असल्याचे पोस्टरमध्ये लिहिलं.
दरम्यान, महाबैठकीत नेत्यांनी नितीश कुमार यांना बंगळुरू बोलावून त्याचा अपमान केला. काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात नितीश कुमार यांना अनस्टेबल म्हटलं गेले. ही काँग्रेसची नीती आहे. नितीश कुमार महाआघाडीत यावेत पण त्यांची महत्त्वाची भूमिका नको असं काँग्रेसला वाटते. यासाठी नितीश कुमार जबाबदार आहेत असं बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी म्हटलं.