पटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापनेसाठी तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दबदबा वाढला आहे. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. दरम्यान, पाटण्यात नितीश कुमार यांचे विविध पोस्टर लावण्यात आले आहेत. पाटण्यात लावलेले नितीश कुमारांचे हे पोस्टर चर्चेत आहेत. हे पोस्टर येथील कोतवाली पोलिस स्टेशनसमोर चौकाचौकात लावण्यात आले आहे. ज्यामध्ये नितीश कुमार यांचा फोटोच्या बाजूनला दोन वाघांचे फोटो लावण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये लिहिले आहे, "'टाइगर जिंदा है". दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी डबल इंजिन सरकारचे पोस्टर लावण्यात आले होते, त्याच ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहे. तेव्हा त्या पोस्टरमध्ये नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो होते. एनडीए सरकारच्या शपथविधीपूर्वी नितीश कुमार यांचे हे पोस्टर लावण्यात आले आहे. अशा स्थितीत हे पोस्टर केंद्रीय राजकारणात नितीश कुमारांच्या वाढत्या राजकीय पावलांकडे बोट दाखवत असल्याचं बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला असल्याने भाजपची कामगिरी चांगली झाली आहे. राज्यातील १६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या जदयूने १२ जागा ताब्यात घेण्यात यश मिळविले तर १७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, बिहार भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही २०२५ च्या विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली १९९६ पासून बिहारमध्ये निवडणूक लढवत आहोत.