एस. पी. सिन्हापाटणा : भाजपची साथ सोडून महागठबंधनाची साथ करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता आपली डगमगणारी बोट किनाऱ्यावर लावण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची गरज पडली आहे. एकीकडे हे दोघेही एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत; तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात भेटीगाठी होत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. यावेळी माजी खासदार पवन वर्मा उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मदतीची गरज व्यक्त केली आहे. दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. प्रशांत किशोर पुन्हा एकदा आपल्याबरोबर यावेत, असा नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे. आपले जन-सुराज अभियान अयशस्वी झाल्यानंतर हादरलेले प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांची साथ करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आतून भेट, वरून टीकाबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांना सांगितले होते की, प्रशात किशोर यांना बिहारचे एबीसी तरी माहीत आहे का? ते तर व्यावसायिक आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे. ते भाजपची मदत करतात. याला प्रत्युत्तर देताना प्रशांत किशोर यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. दोघेही वरून टीका करतात व आतून भेट घेतात, असे दोन-चार दिवसांतच उघड झाले आहे.