नवी दिल्ली - India Alliance Meeting Update(Marathi News) मंगळवारी इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत बैठक झाली. यात विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा सहभाग होता. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.परंतु नीतीश कुमार यांना संयोजक बनवण्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेआधीच नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव निघून गेल्याची चर्चा आहे. आता एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने मोठी बातमी दिली आहे. ज्यानुसार नीतीश कुमार यांनी इंडियाऐवजी भारत नाव चांगले असल्याचे म्हटलं आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत नीतीश कुमार यांनी म्हटलं की, देशाला भारत नावानेच ओळखले पाहिजे. नीतीश कुमारांचे हे विधान अशावेळी आलं जेव्हा भाजपा आधीपासून देशाचे नाव अधिकृतपणे भारत ठेवण्याचा विचार करत आहे. नीतीश कुमार यांचे विधान ऐकून सोनिया गांधी हैराण झाल्या. कारण नीतीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात जातानाचे चित्र दिसत आहे.टाइम्स न्यूजनं ही बातमी दिली. त्यामुळे नीतीश कुमार यांचा इंडिया आघाडीत मोहभंग झालाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नीतीश कुमार यांनी भलेही मला कुठल्याही पदाची लालसा नाही असं म्हटलं असले तरी त्यांच्या मनात निश्चितच जर आपण विरोधकांना एकजूट करत असू तर त्याचा लाभ झाला पाहिजे अशी इच्छा आहे. त्यामुळे कदाचित इंडिया आघाडीच्या या बैठकीपूर्वी बिहारमध्ये नीतीश कुमार पंतप्रधानपदाचे मुख्य चेहरा म्हणून बिहारमध्ये पोस्टरबाजी झाली होती. मात्र बैठकीत असा कुठलाही अजेंडा चर्चेला आला नाही ज्याची नीतीश कुमार यांच्या जदयूने अपेक्षा केली होती.
आता पुढे काय होणार?नीतीश कुमार असे नेते आहेत जे पुढे काय करतील याचा अंदाज कुणालाही लागत नाही. त्यांच्या खास लोकांनाही त्याची भनक नसते. आता इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजपाच्या अजेंड्याला योग्य ठरवल्याचं नीतीश कुमारांचे हे पाऊल खूप काही बोलून जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र आगामी काळात नीतीश कुमार त्यांच्या भविष्याबाबत राजकीय संकेत नक्कीच देतील कारण २९ डिसेंबरला जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे.