एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची जीभ दिवसेंदिवस घसरत आहे. विशेषत: जाहीरसभांमध्ये भाषणे करताना ते ‘स्लिप ऑफ टंग’ होत आहे. पटना साहिब लोकसभा मतदारसंघातील दनियावा भागात एनडीएचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीनितीश कुमार यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री करण्याचे आवाहन जनतेला केले. त्यांच्या अंगरक्षकानेही चूक कानात सांगताच नंतर त्यांनी सारवासारव केली.
त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला...
यासोबतच नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. लालू प्रसाद यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला. मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर पत्नीला मुख्यमंत्री बनविले. सतत मुलगा मुलगी करत असतात. आम्ही एकत्र आलो होतो. मात्र आम्हाला खूप त्रास आहे हे दिसल्यावर आम्ही बाहेर पडलो.
चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले
नितीश कुमार यांचे सध्या वाईट दिवस चालू आहेत. भाषणादरम्यान जीभ घसरणे आता सामान्य झाले आहे, परंतु आता त्यांचे हेलिकॉप्टरही त्यांना धोका देऊ लागले आहे. मसौढी येथे एका जाहीरसभेला संबोधित केल्यानंतर तेथून निघण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढताच पायलटने त्यांना हेलिकॉप्टरचे इंधन संपल्याचे सांगितले.
यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार संतप्त होऊन रस्तेमार्गे निघून गेले. मात्र, ही घटना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा मोठा निष्काळजीपणा आहे. एकप्रकारे हा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी खेळ आहे. हवेत तेल संपले असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.