पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून जागा वाटपावरून भाजपा आणि नितिशकुमार यांच्या जेडीयूमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादासारखी कोणतीही गोष्ट नसून सारे काही ठीक असल्याचे म्हटले आहे.
रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जुना जागा वाटपाचा फॉर्म्युला चालणार नाही. नवीन फॉर्म्युल्यानुसार जागांचे वाटप झाले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. भाजपासोबत यावेळी जागांचे वाटप 1 : 1.3 किंवा 1: 1.4 राहील. या प्रस्तावावर भाजपाला विचार करायला हवा, असे म्हटले होते.
यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी प्रत्यूत्तर दिले होते. त्यांनी किशोर यांचे नाव न घेता म्हटले की, काही लोक कोणत्या विचारधारेनुसार नाही, तर निवडणुकीचा डेटा गोळा करून ठोकताळे बांधण्याची कंपनी चालवत राजकारणात आले आहेत. ते आघाडी धर्माच्या विरोधात वक्तव्ये करून विरोधकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
किशोर यांच्या वक्तव्यावर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनीही आक्षेप घेतला आहे. जागावाटप प्रसारमाध्यमांसमोर नाही तर एकत्र बसून केले जाते, असे म्हटले.
मोदी यांच्या टीकेवर किशोर यांनी जोरदार गहलाल केला. त्यांना परिस्थितीतून बनलेले मुख्यमंत्री म्हणून हिणवताना बिहारमध्ये नितीशकुमार यांचे नेतृत्व आणि जेडीयूला सर्वात मोठा पक्ष बनविण्याची भूमिका लोकांनी ठरवलेली आहे. कोणत्या दुसऱ्या पक्षाने किंवा नेत्याने नाही. 2015 मध्ये दारूण पराभव पत्करूनही राजकीय परिस्थिती बदलल्याने उपमुख्यमंत्री मोदींकडून राजनैतीक मर्यादा आणि विचारधारेवर ऐकणे हा सुखद अनुभव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.