पटना : पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल, असा दावा करत जे लोक जेडीयू आणि सहकारी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची वाईट स्थिती होईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
भाजपा आणि जेडीयू यांच्यात कोणताही मतभेद नाहीत. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा मिळतील असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. जेडीयूच्या एका आयोजित बैठकीत नितीश कुमार बोलत होते. यावेळी नितीश कुमार म्हणाले, "असे अनेक लोक आहेत, त्यांना वाटते की आमच्या आघाडीमध्ये गडबड आहे. तर असे काही नसून जे गडबड करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचीच बिकट अवस्था होणार आहे."
याचबरोबर, नितीश कुमार यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. असाच सल्ला त्यांनी पार्टीच्या प्रवक्त्यांनाही दिला आहे. तसेच, ते म्हणाले," 2010 ची विधानसभा निवडणुक आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी बहुमत मिळेल अशी आशा नव्हती. मात्र, आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा आत्मविश्वास बाळगा."