नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रथमच निवडणुकीच्या प्रचारसभेत एकत्र दिसणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अमित शाह आणि नितीश कुमार बुराडी विधानसभा मतदार संघात प्रचारसभा घेणार आहेत.
येत्या 2 फेब्रुवारी रोजी येथे सभा होणार आहे. या मतदार संघात जनता दल युनायटेडचे शैलेंद्र कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जदयू आणि भाजप यांच्यात युती असून यानुसार जदयूला दोन जागा देण्यात आल्या आहेत.
जदयूचे राष्ट्रीय महासचिव संजय कुमार झा म्हणाले की, नितीश कुमार पहिल्यांदाच निवडणुकीच्या प्रचार सभेत अमित शाह यांच्यासोबत दिसणार आहे. नितीश कुमार जदयूच्या उमेदवारासाठी दोन सभा घेणार आहेत. जदयूचे दोन उमेदवार बुराडी आणि संगम विहार मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या बुराडी येथील सभेत शाह सामील होणार असून ते जदयूच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. भाजपचे माजी आमदार एससीएल गुप्ता संगम विहार मतदार संघातून जदयूचे उमेदवार आहेत.
दिल्लीतील 70 विधानसभा मतदार संघासाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. यावेळी भाजप आणि जदयू एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहे.