ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - ""कॉंग्रेस पक्षाने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यावे, कॉंग्रेस आणि नितीश कुमारांची साथ म्हणजे जन्नतमध्ये बनलेल्या जोडीप्रमाणे असेल, कारण कॉंग्रेस म्हणजे कोणताही नेता नसलेला पक्ष आहे तर नितीश कुमार म्हणजे पक्ष नसलेले नेते आहेत"", असं मत ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं. इतक्यावरच ते थांबले नाहीत, काँग्रेस पक्षाची संघटनात्मक स्थिती एवढी बिकट आहे की राहुल गांधी यांनी राजकारण सोडून अन्य काही केले तर ते त्यांच्यासाठी, पक्षासाठी व देशासाठीही मोठे उपकार ठरतील असंही ते म्हणाले. सध्याच्या घडीला विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरू शकेल, असा एकही चेहरा नाही. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यायचे ठरवल्यास मोदींचा झंझावात रोखता येणे शक्य आहे असं मत गुहा यांनी मांडलं.
‘इंडिया आफ्टर गांधी’ या आपल्या पुस्तकाच्या दशकपूर्तीनिमित्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुहा म्हणाले की, कदाचित आता काँग्रेस पक्षाची देशाला गरज राहिलेली नाही. त्याची जागा घ्यायला दुसरा एखादा पक्ष उदयाला येऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान म्हणून उभा राहू शकेल, असा विरोधी पक्षांमध्ये कोणीही नेता नाही, असे सांगून गुहा म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांचे नेतृत्व करावे, असे माझे स्वप्न आहे.
हा विचार अधिक स्पष्ट करताना गुहा म्हणाले की, नितिश कुमार हे पक्ष नसलेले नेते आहेत व काँग्रेस हा नेता नसलेला पक्ष आहे. त्यामुळे नितिश कुमार यांनी खेळीमेळीने काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला तरच विरोधी पक्ष मोदींपुढे टिकाव धरण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असे होणार नाही, हे खरे असले तरी सच्चा लोकशाहीवादी या नात्याने माझे ते स्वप्न आहे.
याच मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलताना गुहा म्हणाले की, मोदी हे सध्या देशातील सर्वात समर्पित राजकीय नेते आहेत. त्यांच्याकडे काम करण्याची असीम ऊर्जा आहे. राजकारणाशी त्यांची बांधिलकी अतुलनीय आहे. याच जोरावर त्यांनी सत्तेत प्राबल्य, सर्वोपरिता व वरचढपणा मिळविला आहे. मात्र मोदी कट्टर हिंदुत्ववाद्यांपासून दूर राहतील किंवा आर्थिक सुधारणा घडवून आणतील या विश्वासाने त्यांना मते देणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे, असेही ते म्हणाले.
सन 2007 मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या गुहा यांच्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत गेल्या दशकातील घडामोडींचा आढावा घेणारी पुरवणी जोडण्यात आली आहे. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाचा ऱ्हास, पंतप्रधान मोदी यांचा उदय, वेगवान आर्थिक विकास, त्यासोबत पर्यावरणाची होत असलेली हानी व धुमसते काश्मीर या विषयांवर भाष्य केले आहे.