Nitish Kumar son Nishant Kumar in Bihar Politics: आगामी २०२५च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार आपला मुलगा निशांत कुमार यांना लॉन्च करू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नितीशकुमार हे पाऊल उचलतील असे बोलले जात आहे. निशांत हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाच्या वृत्ताने लालू प्रसादांच्या आरजेडीला धक्का बसला आहे. निशांत कुमार हे सहसा राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. निशांत क्वचित प्रसंगी वडील नितीश कुमार यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतात. पण सीएम नितीश कुमार नुकतेच मुलगा निशांतसोबत हरयाणात गेले, तेव्हापासून या चर्चांना उधाण आले आहे.
निशांत कुमारच का?
निशांत कुमार यांना JDU मध्ये सक्रिय करावे आणि त्यासाठी त्यांना पक्षात काही पद द्यावे, अशी मागणी काही JDU नेत्यांनी आधीच मांडली होती. वास्तविक, ७३ वर्षीय नितीश कुमार यांनी 'पक्षांतर्गत मागण्या' कधीच मान्य केल्या नाहीत. परंतु ताज्या घडामोडींनुसार, वय आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता नितीश कुमार पक्षातील मागण्यांशी सहमत होऊ शकतात, असे बोलले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच निशांत औपचारिकपणे जेडीयूमध्ये प्रवेश करतील. कारण सध्याच्या घडीला नितीश कुमार यांच्यानंतर त्यांची जागा घेऊ शकेल, असे जेडीयूकडे दुसरे नेतृत्व नाही.
लालूंना टक्कर देणारा नितीश यांचा प्लॅन
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत जेडीयूसमोर अनेक आव्हाने आहेत. विशेषत: लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासारख्या विरोधी नेत्यांचा पराभव करण्यासाठी नितीश यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणले, तर ती जेडीयूसाठी नवी सुरुवात ठरू शकते. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश यांच्याकडे जेडीयूला वाचवण्याचा हा शेवटचा पर्याय आहे. निशांत यांना राजकारणात सक्रीय करून ते लालूंसोबतच्या लढाईला सामोरे जाऊ शकतील आणि जेडीयूदेखील जोरदारपणे पुढे जाऊ शकेल.