एस. पी. सिन्हा
पूर्णिया : पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राजद व काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी घणाघातील टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे केली. नितीशकुमार यांच्याकडे कोणतीही विचारसरणी नाही. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणासाठी त्यांनी समाजवादाला तिलांजली दिली, असा आरोप त्यांनी केला. नितीशजी २०१४ मध्येही तुम्ही हेच केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जनता ही महाआघाडी उखडून टाकेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. पूर्णियात आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
नितीशकुमार पंतप्रधान बनू इच्छितात. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसून ते राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. माझी खुर्ची शाबूत राहावी एवढी त्यांची एकच विचारसरणी आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
ते कधिही पंतप्रधान होऊ शकत नाहीतनितीशकुमार यांना लालुप्रसाद यादव यांच्यासोबत जाण्यासाठी बिहारी जनतेने मतदान केले नव्हते. मात्र, पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी जनादेश डावलला. पण, ते कधीही पंतप्रधान बनू शकत नाहीत, असे शहा म्हणाले.
...‘ते’ तर धोकेबाजनितीशकुमार हे धोकेबाज आहेत. त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना धोका दिला. शरद यादव यांच्यासोबतही त्यांनी हाच कित्ता गिरवला. त्यानंतर जीतन राम मांझी, रामविलास पासवान यांनाही धोका दिला. उद्या राजदलाही धोका देतील, असे शहा म्हणाले.