Nitish Kumar Prashant Kishor: महाराष्ट्रात जरी भाजपाला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या साथीने सत्ता स्थापना करण्यात यश आले असले तरी बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधनचे सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांनी भाजपा दिलेल्या धक्का चांगलाच चर्चेत आहे. राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची चकमकही तीव्र झाली आहे. भाजपा सोबतच आता निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांनीही बिहारच्या नव्या सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या २० लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच, नितीश कुमार खु्र्चीला फेविकॉल लावून चिकटून बसले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
नितीश कुमार हे 'फेविकॉल' लावून खुर्चीवर चिकटून बसले आहेत. मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्याकडून सुटतच नाही. इतर पक्ष कधी इकडे तर कधी तिकडे फिरत बसतात पण नितीश कुमार मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अगदी फेविकॉलसारखे चिकटले आहेत. जनतेने या सरकारला मतदान केले नाही. हे सरकार 'जुगाड'वर चालत आहे. त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा अजिबातच विश्वास नाही. २००५ ते २०१० या काळात NDA सरकारने चांगले काम केले होते. पण त्यानंतर आता नितीश कुमार मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला फेविकॉलसारखे चिकटून बसले आहेत", अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
नितीश कुमार यांनी महागठबंधन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बिहारमधील तरुणांना २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बिहारमध्ये किमान १० लाख सरकारी नोकऱ्या आणि आणखी १० लाख 'रोजगाराच्या संधी' निर्माण होतील, असे नितीश कुमार म्हणाले होते. नितीश यांच्या नोकरीच्या आश्वासनाची खिल्ली उडवत प्रशांत किशोर म्हणाले की सरकारने येत्या दोन ते तीन वर्षांत ५ ते १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास मी आता सुरू केलेले 'जन सूरज अभियान' बंद करेन आणि मी त्यांचा नेता म्हणून स्वीकार करेन.
जन सूरज अभियानांतर्गत समस्तीपूरमध्ये पोहोचलेल्या प्रशांत किशोर यांनी बुधवारी महागठबंधन सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, शाळांमध्ये शिकवणाऱ्या नोकरदार शिक्षकांना सरकार वेळेवर पगार देऊ शकत नाही आणि त्यांना नवीन नोकऱ्या कुठून देणार. आगामी काळात आणखी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.