ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भाजपा विरोधी आघाडीचे पंतप्रधान उमेदवार म्हणून नितिश कुमार हेच अत्यंत योग्य नेते असल्याची गुगली शरद पवारांनी टाकली आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसपेक्षा जास्त प्रभावी असेल असं मत व्यक्त करताना, पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितिश कुमारच सुयोग्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
ईकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पवारांनी म्हटले आहे की, "बिहारच्या निवडणुकांमध्ये नितिश कुमारांनी मिळवलेलं यश काँग्रेस व भाजपाविरोधकांसाठी महत्त्वाचा सिग्नल आहे. जर, भाजपाविरोधक आजच्या तारखेला एकत्र आले आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करायला लागले, तर नितिश कुमारांचे नाव पहिल्या स्थानावर असेल असे पवार म्हणाले.
भाजपाविरोधक आघाडीसाठी काँग्रेसचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे पवारांनी म्हटले आहे. बिहारमध्ये नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीला यश मिळेल असा अचूक अंदाज पवारांनी व्यक्त केला होता. तर, आता 2017च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये मायावतींच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टी विजय मिळवण्याची शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे.