पाटणा, दि. 27 : बुधवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे मुख्यमंत्री नितीश कुमार चोवीस तासांच्या आत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा - जदयू समीकरण जुळलं असून 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आधी आलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार पाच वाजता शपथ घेणार होते. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारी नाट्याला झालेली सुरुवात पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. त्यानंतर नितीशकुमार यांनी सरळ घरी जाणे पसंद केले. तर भाजपा नेते सुशील मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीश कुमार सकाळी दहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले होते. यावेळी ते म्हणाले होती की, आम्ही राज्यपालांना भेटलो आहे. आमच्याकडील 132 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले आहे. आम्ही विश्वास ठराव पास करु असा विश्वास सुशील मोदी यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, 1:30 वाजता राजभनातून नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी राज्यपालांना भेटून गेल्यानंतर पहाटे आडीच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांसह तेजस्वी यादव यांनी राजभवनावर आपला मोर्चा काढला होता. यावेळी राजभवनाच्या परिसरात नितीश कुमार विरोधात तेजस्वी यादवांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरजेडीच्या सहा आमदारांना भेटण्याची परवाणगी मिळाली होती. तेजस्वी यादव यांच्यासह सहा जणांनी पहाटे आडीच वाचता राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले मुद्दे त्यांच्यापुढे ठेवले. सकाळी 11 वाजता आम्हाला विश्वास ठराव मंजुर करण्याचे सांगितले असताना नितीशकुमार यांना सकाळी दहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची परवानगी कशी दिली. बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा असताना नितीश कुमार यांना आपच्या आधी विश्वास ठराव करण्याची परवानगी कशी ? यासरख्या प्रश्नावर राज्यपाल आणि तेजस्वी यादवमध्ये चर्चा झाली.
आम्ही आमचे मत समोर ठेवलं आहे. राज्यपाल यांनी विचार करणार असल्याचं अश्वासन दिलं आहे. उद्या सकाळपर्यंत ते निर्णय घेणार असल्याचे आरजेडी प्रवक्ता मनोज झा यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले. राज्यपालांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारावर टिका केली. ते म्हणाले की, नितीशकुमार यांना स्वत:वर विश्वास आहे तर आपल्या घरामध्ये आमदारांना बंदी बनवून का ठेवले आहे. जनता दलाचे अर्धे आमदार आमच्या बाजूने आहेत. ज्या भाजपावर निवडणुकीत टिकास्त्र केले होते आज त्यांच्याबरोबर सरकर स्थापन कोणत्या तोंडानं करत आहेत असेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी आपल्या मनासारखे होत नाही हे पाहून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाआघाडी तोडून टाकली.
- काँग्रेसने व्यक्त केले दु:ख
नितीशकुमार यांच्या राजीनाम्याबद्दल काँग्रेसने दु:ख व्यक्त केले. महाआघाडीला सरकार स्थापन करण्याचा कौल दिला होता, तो विसरून चालणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.
- पंतप्रधानांकडून अभिनंदन :
राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीशकुमारजी, तुमचे अभिनंदन. देशातील १२५ कोटी नागरिकांकडून तुमचे या सचोटीबद्दल स्वागत व पाठिंबा, असे टिष्ट्वट पंतप्रधानांनी केले. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राजकीय मतभेदांपलीकडे जाणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराविरोधात एकत्रित संघर्ष करणे ही काळाची आणि देशाची गरज आहे, असेही मोदी यांनी म्हटले.
- जदयू+भाजपा आघाडी = १२९
संयुक्त जनता दल व भाजपा यांची बैठक रात्री झाली. त्या बैठकीत दोघांनी मिळून सरकार बनविण्याबाबत चर्चा झाली. त्यात एकमत झाल्याने नितीश यांचा शपथविधी आजच पार पडला. जदयूचे ७१ व भाजपा व मित्रपक्षांचे ५८ आमदार आहेत. बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज असून, जदयू आणि भाजपा आघाडीचे मिळून १२९ आमदार होतात. लालू आणि काँग्रेस यांचे मिळून केवळ १०७ आमदार होतात. त्यामुळे सर्वाधिक संख्याबळाच्या जोरावर राज्यपालांकडे लालू यांनी वेळ मागितली असली तरी त्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमीच आहे.
- अन् नाट्य यशस्वी
लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे तेजस्वी यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश यांची अपेक्षा होती. मात्र लालूंनी त्याला विरोध केला होता.मग लालूंचाच ह्यगेमह्ण करण्यासाठी नितीश यांनी भाजपाच्या साथीने राजीनाम्याचे नाट्य रचले. त्यात ते यशस्वीही झाले. हे सारे पूर्वनियोजित होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
- आम्हाला सरकार बनवायला बोलवा : लालू
लालूप्रसाद यांनी ८0 आमदार असलेला राष्ट्रीय जनता दल हाच सर्वात मोठा पक्ष असल्याने, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यास बोलवावे, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांचा वेळ मागितली आहे. नितीशवर हत्येचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. नितीश व तेजस्वी यांना दूर ठेवून, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल व काँग्रेस यांच्या महाआघाडीने नवा मुख्यमंत्री निवडून सरकार स्थापन करावे, अशीही सूचना लालूप्रसादांनी केली आहे.
राष्ट्रीय जनता दल (राजद) | 80 |
जनता दल यूनायटेड (जदयू) | 71 |
काँग्रेस | 27 |
भाजपा | 53 |
सीपीआय | 3 |
लोक जनशक्ती पार्टी | 2 |
राष्ट्रीय लोक समता पार्टी | 2 |
हिंदुस्तानी अवाम मोर्चा | 1 |
अपक्ष | 4 |