बक्सर - बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांची खासियत थ्री सी म्हणजेच क्राइम, करप्शन आणि कम्युनलिज्म याबाबत झीरो टॉलरेंस अशी आहे. मात्र त्याचसोबत आघाडीच्या राजकारणात पलटी मारणं हेसुद्धा आहे. त्यामुळे वारंवार पलटी मारणाऱ्या बातम्यांमध्ये नितीश कुमार सातत्याने चर्चेत असतात. बिहारला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यात काँग्रेसच्या एका आमदारानं या चर्चेला बळ दिलं आहे.
काँग्रेस आमदार संजय तिवारी उर्फ मुन्ना यांनी म्हटलं की, नाराज असलेले नितीश कुमार लवकरच एनडीएची साथ सोडून महाआघाडीसोबत येणार आहेत. त्यांच्या नाराजी मागचं कारण म्हणजे त्यांचे ड्रीम असलेले बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवणं ते झालं नाही. केंद्र सरकारच्या थेट नकारामुळे नितीश कुमार इतके नाराज झाले की त्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत असं त्यांनी सांगितले.
वारंवार का होते नाराजीची चर्चा?
अशाप्रकारे नाराजीच्या बातम्या चर्चेत येण्यास स्वत:नितीश कुमार कारण आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या राजकीय सहकाऱ्यांनाही ते कुठल्या कारणाने नाराज होतील आणि खुश होतील हे माहिती होत नाही. परंतु त्यांची राजकीय नाराजी ही त्यांच्या निकटवर्तीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच होते. एनडीएत जायचे असेल तर त्यांच्या जवळचे संजय झा यांचं मत असल्याचं सांगतात आणि महाआघाडीत जायचं असेल तर ते विजेंद्र यादव यांचं नाव घेतात.
नितीश कुमार हे राजकारण स्वत:भोवती ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला आपली राजकीय स्थिती दाखवण्यासाठी हे करतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यासाठी नितीश कुमार यांनी जे दोन शब्द सर्वाधिक वापरले ते म्हणजे जातीयवाद आणि जंगलराज. जंगलराज म्हणत एनडीएमध्ये आणि जातीयवादाचा आरोप करत महाआघाडीसोबत जात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या सुरक्षिततेने राजकीय पोकळी भरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जवळच्यांनाही त्यांचा विवेक कधी जागृत होतो ते कळत नाही आणि मग एका झटक्यात नितीश कुमार आपला पत्ता बदलतात.मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत सातत्याने पलटी मारण्याची भाषा होते. ते कुठल्याही गोष्टीवरून नाराज होतात. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नाही तर पक्षही वाचवायचा आहे त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे असं त्यांचे राजकारण असते.