नवी दिल्ली, दि. 6 - बिहारमधील पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी गुजरात सरकारकडून देण्यात येणारी मदत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्विकारली आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात जे नितीश कुमार यांनी कधीच केलं नाही ते यावेळी करत आहेत. बिहारमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे गुजरात सरकारने पाच कोटींचा मदतीचा चेक दिला आहे, जो नितीश कुमार यांनी स्विकारला आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा 2010 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता. मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता.
आता पुन्हा एकदा बिहारमध्ये पूर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या मदतीसाठी 500 कोटींचं पॅकेज देण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना जेडीयूला सामील करण्यात आलं नसतानाही नितीश कुमार यांनी ही मदत स्विकारली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नऊच्या नऊ मंत्री भाजपाचे आहेत.
एका महिन्यापुर्वी एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला मोदींच्या मंत्रिमंडळात एक ते दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मंत्रीमंडळ विस्ताराची माहिती मिळाल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरुन लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. 'जेडीयूच्या काही नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी कुर्ता - पायजमा शिवून ठेवला होता. पण त्यांना आमंत्रणच मिळालं नाही', अशी खिल्ली लालू प्रसाद यादव यांनी उडवली होती.
बिहारमधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांचं जेवणाचं आमंत्रणही नाकारलं असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला. 2010 रोजी भाजपाने डिनरच आमंत्रण देऊनही नितीश कुमार यांनी ते नाकारलं होतं, कारण त्यामध्ये नरेंद्र मोदी सामील होणार होते. मोदींचं आमंत्रण न स्विकारण्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे.
2010 मधील हे राजकीय युद्ध तेव्हा सुरु झालं, जेव्हा पाटणामधील काही वृत्तपत्रांमधील पहिल्या पानावर बिहार पुरासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मदत करत असल्याची जाहिरात छापण्यात आली होती. यावरुन संतापलेल्या नितीश कुमार यांनी फक्त भाजपाचं डिनर आमंत्रण धुडकावून लावलं नाही, तर दोन वर्षांपुर्वी पूर मदतीसाठी देण्यात आलेला चेकही परत करुन टाकला.
यानंतर तीन वर्षांनी 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आपली 17 वर्षांची युती तोडली होती. गेल्या महिन्यात पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी महाआघाडीतून माघार घेत एनडीएशी हातमिळवणी केली आहे.