ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी दुपारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी २६ वर्षीय तेजस्वी यादव यांनी शपथ घेतली आहे. प्रस्तावित कार्यक्रमानुसार आज दुपारी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश कुमार यांना बिहारच्या ३४ व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. काँग्रेसचे अशोक चौधरी यांनी बिहारचे शिक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात २८ जणांचा समावेश आहे.
पाटण्यातील गांधी मैदानात पार पडलेल्या या सोहळ्यात महागठबंधनचे नेते लालू प्रसाद यादव कुटुंबियासह उपस्थित होते. तसेच नीतिश कुमार यांच्या निमंत्रणाचा मान राखून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी , जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक व ओमर अब्दुल्ला, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह इतर अनेक दिग्गज उपस्थित होते. भाजपातर्फे व्यंकय्या नायडू यांनी शपथविधी सोहळ्यास हजेरी लावली.
नीतिशकुमार यांच्यानंतर लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजस्वी व तेज प्रताप यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
तेजस्वी व तेज प्रताप यादव यांना ३-३ मंत्रीपदे बहाल करण्यात आली आहेत. मात्र थपथ घेताना शब्दोच्चार चुकल्याने तेजप्रताप यादव यांना दुस-यांदा शपथ घ्यावी लागली.
- तेज प्रताप यांनी नेमकी काय चूक केली ?
लालू यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांना राजपालांनी दोनदा शपथ दिली. पण, दोन्ही वेळी त्यांनी एकच चूक केली. तेज प्रताप यादव यांनी कागदावरील शपथेचा मजकूर वाचताना 'अपेक्षित' या शब्दाचा 'उपेक्षित' असा उच्चार केला. त्यामुळे राज्यपाल रामनाथ गोविंद यांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. यानंतरही त्यांनी हीच चूक केली. दरम्यान, राज्यपालांनी त्यांना थांबवले आणि योग्य उच्चार सांगितला. यानंतर तेज प्रताप यादव यांनी बरोबर उच्चार करून उर्वरित शपथ पूर्ण केली.