ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या गुजरातमधील सभेत सहभागी न होण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात वाढणा-या जवळीकतेबाबतची चर्चा आता देशाच्या राजकारणात आणखी रंगात येण्याची शक्यता आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध दर्शवण्यासाठी सभेचं आयोजन केले आहे.
बिहारच्या दौ-यावर असताना हार्दिकने नितीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना या सभेचे निमंत्रण दिले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यस्त वेळापत्रक असल्याने नितीश कुमार गुजरातमधील हार्दिक पटेलच्या सभेसाठी जाणार नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. याची माहितीही हार्दिक पटेलला कळवण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी ही सभा होणार आहे.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे कारण जरी पुढे करण्यात आले असले, तरी हार्दिकच्या सभेला न जाण्याचे मुख्य कारण पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात वाढणा-या जळकीत असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाटणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 350 व्या प्रकाश पर्व कार्यक्रमातही नितीश कुमार यांचे जाहीर कौतुक केले होते. यामुळे बिहारच्या राजकारणात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.
सभेमध्ये सहभागी होणार नाही नितीश कुमार
हार्दिक पटेलने 'मोदी हराओ, देश बचाओ' या सभेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते. तेव्हा नितीश कुमार यांनी सभेत सहभागी होण्यासाठी सहमतीही दर्शवली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, आता नितीश कुमार हार्दिकच्या सभेसाठी गुजरातमध्ये जाणार नाहीत. नुकतेच पार पडलेल्या 'प्रकाश पर्व' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकमेकांचे कौतुक करताना दिसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांना बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याबद्दल त्यांची पाठ थोपटली होती. तसेच दारूबंदीचे काम केवळ एकट्या नितीश कुमार किंवा एखाद्या पक्षाचे नाही. त्याला चळवळीचे स्वरूप यायला हवे. ते यशस्वी झाल्यास संपूर्ण देशासमोर बिहार आदर्श ठरेल, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
नितीश कुमारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं
दरम्यान, नितीश कुमार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्जिकल स्टाईक आणि नोटाबंदी निर्णयावरुन समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यात वाढणा-या जवळीकतेबाबत सध्या देशाच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे.