पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील नितीश कुमार यांनी बलात्काराच्या घटना या पॉर्न साइट्समुळे होतात, असे भाष्य केले होते.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध राज्यात महिल्यांवर झालेले अत्याचार आणि हत्येच्या घटनांमुळे देशात खळबळ उडाली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे, असे सांगत नितीश कुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र नरेंद्र मोदींना लिहिले आहे.
इंटरनेटवरील लोकांच्या अमर्याद प्रवेशामुळे मुले आणि तरुण अश्लील, हिंसक आणि अनुचित सामग्री पाहत आहेत. जे अनिष्ट आहे. इंटरनेटच्या प्रभावामुळे अशा काही घटना घडत असतात. बर्याचदा अशा प्रकरणांमध्ये गैरवर्तनाच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडिया - व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादीवर तयार केले जातात आणि व्हायरल केले जात आहे. विशेषकरून या प्रकारच्या सामग्रीचा लहान मुले आणि काही तरूणांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत आहे, असे नितीश कुमार यांनी पत्रात म्हटले आहे.
बर्याच प्रकरणांमध्ये इंटरनेटवरील सामग्रीचा वापर अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा घटक म्हणून पाहिले जाते. याव्यतिरिक्त, अशा सामग्रीचा दीर्घकालीन वापर नकारात्मकपणे काही लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, ज्यामुळे बऱ्याच सामाजिक समस्या उद्भवतात आणि महिलांवरील अत्याचार वाढ होत असल्याचे सांगत या संदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यात काही तरतुदी केल्या गेल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात सरकारला अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, इंटरनेट सेवा देणाऱ्यांनाही कडक सूचना देणे आवश्यक आहे. याशिवाय, पालक, शैक्षणिक संस्था आणि अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक जागरूकता मोहीम राबविणे देखील आवश्यक असल्याचेही नितीश कुमार यांनी पत्रात नमूद केले आहे.