हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारात महाआघाडीच्या अभूतपूर्व यशस्वी प्रयोगामुळे हुरूप मिळालेले मुख्यमंत्री नितीशकुमार आता आसामात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधायला निघाले आहेत. नितीशकुमार यांनी गुरुवारी एआययुडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांच्याशी विस्तृत चर्चा करीत चाचपणी सुरू केली आहे.आसाम गण परिषदेच्या प्रफुल्ल महंत गटाशीही संपर्क साधण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही या राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांशी निवडणूक युती करण्यात स्वारस्य दाखविले आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांच्या स्वतंत्ररीत्या भेटीगाठी घेत भाजपविरुद्ध प्रत्येक राज्यात आघाडी उभारण्याबाबत शक्यता पडताळण्याला गती दिली आहे. आम्ही आजवर काँग्रेसशी लढत आलो आहे. आता काळ बदलला आहे. भाजपला रोखण्याची वेळ आली आहे. ते कसे करता येईल ते बघू या अशी प्रतिक्रिया अजमल यांनी लोकमतने संपर्क साधला असता दिली.अजमल यांच्या पक्षाला आसामात वाढता पाठिंबा मिळत असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ पैकी १८ जागा जिंकत या पक्षाने ताकद दाखवून दिली आहे. आगपला दहा तर तृणमूल काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. हे पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला ठोस पर्याय देता येईल मात्र त्याचा लाभ भाजपला उचलता येऊ शकेल. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ५ जागा जिंकणाऱ्या भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत ७ जागा पटकावल्या होत्या.
नितीशकुमारांचा आसामात महाआघाडीचा घाट
By admin | Published: December 10, 2015 11:11 PM