नवी दिल्ली - बिहारमध्ये भाजपसोबत आघाडी केलेल्या नितिशकुमारांच्या जदयू पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक पार पडली. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिशकुमार यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांना संबोधित केले. या बैठकीत आगामी 2019 ची रणनीती ठरविण्यात आली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक भाजप आणि जदयू एकत्रच लढणार असल्याचे शिक्कामोर्तबही झाले. मात्र, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याच नेतृत्वात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले. तसेच या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भाजपनेही जदयूच्या या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले आहे. तसेच कार्यकारिणीने नागरिकत्व संशोधन विधेयकाला आपला विरोध दर्शवला. अफगानिस्तान, बांग्लादेश किंवा पाकिस्तानमधून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई नागरिक सहा वर्षांच्या प्रवासानंतर भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी योग्य असल्याचे कार्यकारिणीने म्हटले आहे. तर नागरिकत्वासाठी धर्म ही बाब महत्वाची नसल्याचेही पक्षाने म्हटले. दरम्यान, सत्ताधारी भाजप आणि जदयू एकत्रच निवडणूक लढवणार असून मोठा विजय मिळवतील, असा आशावादही पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, जागावाटपासंदर्भात नितिशकुमारच अंतिम निर्णय घेतील, असेही कार्यकारिणीकडून स्पष्ट करण्यात आले.