पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून घालविण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र आले आहेत. या विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते तयारी करत आहेत. परंतू, त्यापूर्वीच नितीश कुमारांच्या जदयूने मोठी चाल खेळली आहे. संभाव्य पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव पुढे केले आहे. यामुळे मुंबईतील I.N.D.I.A. ची बैठक वादळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव अलायन्सच्या बैठकीत समान किमान कार्यक्रम आणि आघाडीचे समन्वयक यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या बैठकीपूर्वी विरोधी एकजुटीचे नेतृत्व करणारे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री जामा खान यांनी पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत वक्तव्य केले आहे.
देशातील जनतेला नितीश कुमार यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे, असे जामा खान यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. नितीशकुमार की राहुल गांधी? पंतप्रधानपदाची चर्चा निवडणुकीनंतर होईल, असे जेडीयू नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पीएल पुनिया म्हणाले आहेत.
आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे खुद्द नितीशकुमार यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. एकीकडे नितीश कुमार पंतप्रधानपदाचा दावा नाकारत आहेत, तर दुसरीकडे जेडीयू नेते वेळोवेळी त्यांच्या नावाचा प्रचार करत आहेत. नितीश कुमार नुकतेच दिल्लीत पोहोचले होते आणि यादरम्यान त्यांनी कोणत्याही विरोधी नेत्याची भेट घेतली नव्हती, हे देखील विशेष मानले जात आहे. नितीश यांचा दिल्ली दौरा आणि विरोधी नेत्यांपासून दूर, आता पंतप्रधानपदासाठी त्यांच्याच मंत्र्याचे वक्तव्य. हा सर्व निव्वळ योगायोग आहे की जेडीयूची दबावाची खेळी? अशी चर्चा सुरु झाली आहे.