उद्या पूर्णियामध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. कटिहारमध्ये याची तयारी मंत्री सुरेश यादव हे करत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत असं विधान केलं आहे, ज्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल. अग्निवीर योजना तयार करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे.
बिहार सरकारमधील मंत्री सुरेंद्र यादव सध्या शहराशहरामध्ये, गावागावात जाऊन लोकांना या रॅलीमध्ये येण्यासाठी निमंत्रित करत आहेत. याचदरम्यान, गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र याचदरम्यान, अग्निवीर योजनेवर टीका करताना त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये ही हिजड्यांची फौज सिद्ध होईल, असं विधान केलं.
मात्र जेव्हा या विधानावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराबाबत आम्हाला अभिमान आहे. मात्र आजही आम्ही सरकारच्या अग्निवीर योजनेला विरोध करतो. ही योजना ज्याच्या डोक्यातून बाहेर पडली आहे, त्याला फाशी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.