एस. पी. सिन्हा
पाटणा :बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नसत्या तर राज्यात कोरोना साथीमुळे माणसे मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी सासाराम येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोरोना साथीत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये मोदींची झालेली ही पहिलीवहिली जाहीर प्रचारसभा होती.
मोदी यांनी राजद, काँग्रेस आदी विरोधी पक्षांना टोला लगावताना सांगितले, बिहारला बिमारू राज्य बनविणाऱ्यांना जनतेने पुन्हा सत्तेवर आणू नये. कोरोना साथ पसरल्यानंतर राज्य सरकारने वेळीच पावले उचलली नसती, तर अतिशय भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. एनडीएचे सरकार येण्याआधी बिहारमध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बोकाळली होती; पण आता नितीशकुमारांच्या कारभारामुळे बिहारमधील स्थितीत आमूलाग्र व चांगला बदल झाला आहे.
गरिबांच्या कल्याणासाठी असलेला पैसा पूर्वी भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात असे; पण आता त्याला आळा बसला आहे. त्यामुळेच कोरोना साथीमध्ये राज्यातील गरीब लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करणे शक्य झाले.
एक लाख मुलांमागे सातच महाविद्यालयेबिहारमध्ये दरवर्षी १६ लाख मुले उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात. त्यामध्ये ९.२ लाख मुले व ६.८ लाख मुली असतात. राज्यामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्याही खूप कमी आहे.
या राज्यामध्ये १८ ते २३ वर्षे वयोगटातील दर एक लाख मुलांमागे फक्त सात महाविद्यालये आहेत. देशात बिहारमध्ये सर्वात कमी संख्येने युवक उच्च शिक्षण घेतात. ही स्थिती तिथे २०११ पासून कायम आहे.
विरोधकांवर टीका -केंद्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरसाठी ३७० कलम पुन्हा लागू करू, असे सांगत जनतेकडून मते मागणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली. बिहारमध्ये एनडीएच्याच हाती पुन्हा सत्ता द्या, असे आवाहनही मोदींनी मतदारांना केले.
बिहार - १३.६ टक्के युवक घेतात उच्च शिक्षणबिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्या तरी त्या राज्यातील युवा मतदारांच्या न सुटलेल्या प्रश्नांबद्दल सर्वच पक्षांनी मौन बाळगले आहे.
18ते23वर्षे देशामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या वयोगटातील युवकांचे प्रमाण २६.३ टक्के असून, बिहारमध्ये ते फक्त १३.६ टक्के.
100 युवकांमध्ये (१८ ते २३ वर्षे वयोगटातील) बिहारचे अवघे १३ युवक असतात.
19% झारखंडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांचे प्रमाण अधिक म्हणजे आहे.
2019 साली राष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. त्याच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात येते.
2015च्या विधानसभा निवडणुकांत या राज्यात ३१ टक्के युवा मतदार होते, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांत युवा मतदारांचे प्रमाण २४.६१ टक्के नोंदविले गेले. ३० वर्षे वयाखालील युवकांची संख्या मोजून ही टक्केवारी निश्चित करण्यात आली होती.
बिहारमध्ये उच्च शिक्षण मिळण्याबाबत मुलांपेक्षा मुलींची अवस्था अधिक वाईट आहे. तेथील १२ टक्के मुलीच उच्च शिक्षण घेऊ शकतात. राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत बिहारमध्ये खूपच कमी संख्येने मुली उच्च शिक्षण घेतात.