पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटणामध्ये गंगा नदीवरील छठ घाटांची पाहणी करत असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा घाटाची पाहणी करत असताना नितीश कुमार यांची बोट जेपी सेतूच्या एका खांबावर आदळली. सुदैवाने या अपघातात नितीश कुमार यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. तसेच त्यांची बोटही मोठ्या अपघातातून वाचली. मात्र या अपघातामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
गंगा नदीमध्ये पाण्याची पातळी अधिक असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पाटणा जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दुखापत झालेली नाही. मात्र स्टीमरमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने दुसरा स्टीमर बदलण्यात आला.
नितीश कुमार हे छठ घाटांचा आढावा घेण्यासाठी निघाले गेले होते. ११ वाजता नसीरीगंज घाटावरून पाटणा सिटीपर्यंत गंगा नदीचा आढावा घेत होते. या दरम्यान ते जेपी सेतूजवळ होते. त्यावेळी त्यांची बोट जेपी सेतूच्या खांबावर आदळली.