ऑनलाइन लोकमत
बेतिया (बिहार), दि. २७ - दलित, महादलित, मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय यांचं प्रत्येकी पाच टक्के आरक्षण कमी करायचं आणि ते अन्य धर्मीयांना द्यायचं असा डाव नितिशकुमार व लालूप्रसाद खेळत असून आपण हे कदापी होऊ देणार नाही असं सांगत, नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये नातिश-लालू-काँग्रेस आघाडीचा पराभव अटळ असल्याचा दावा केला.
बिहारमध्ये उद्या तिस-या टप्प्यात मतदान होत असून नरेंद्र मोदींनी नितिश लालूंचं एकत्र येणं ही केवळ सत्तालोलूपता असून, नितिशकुमारांनी गुन्हा सिद्ध झालेल्या लालूंशी युती का केली हा सवाल विचारला. बिहारमध्ये नितिशकुमारांचे साथीदार पैशाचे गैरव्यवहार करत असताना कॅमे-यात कैद झालेले असताना नितिशकुमार काही कारवाई करत नाहीत आणि मॅडम सोनियापण मूग गिळून गप्प आहेत अशी टीका त्यांनी केली.
लालूप्रसाद यादव यांना बिहारची नाही तर आपल्या मुलांना जिंकून देण्याची चिंता आहे. परंतु बिहामधली जनता लालूप्रसादांच्या मुलांना हरवणार असा विश्वास नरेंद्र मोदींनी बेतिया इथे व्यक्त केला.
लालूप्रसाद यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले असून कोर्टाने गुन्हेगार घोषित केले आहे, माझी नितिश बाबूंना विनंती आहे त्यांनी लालूंची संपत्ती जप्त करून वचन दिल्याप्रमाणे तिथे शाळा सुरू करावी असे मोदी म्हणाले. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणारे, नितिश व लालू सत्तेसाठी एकत्र आले असून हा जनतेचा विश्वासघात आहे अशी टीकाही मोदींनी केली आहे.