गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. नितीश कुमार यांनी खातेवाटप केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी हे पुत्र संतोष कुमार यांना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत नाराज आहेत. तसेच त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे. नितीश कुमार सरकारला इशारा देताना मांझी यांनी सांगितले की आम्ही रस्ताही बनवू शकतो आणि गटारही बांधू शकतो. आम्ही ते प्रत्येक काम करू शकतो, जे इतर कुणीही करू शकतो. या विधानावरून मांझी यांचा इशारा हा रस्ते बांधकाम विभागाकडे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मांझी हे ऐनवेळी पारडं बदलणार नाही ना, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
जीतनराम मांझी पुढे म्हणाले की, ही आमच्या घरातील गोष्ट आहे. एका भाकरीनं आमचं पोट भरलं नाही तर आम्ही दोन-तीन भाकऱ्यांची मागणी करणारच ना? आम्हाला किमान दोन भाकऱ्या हव्या आहेत. कारण आम्ही गरीबांचं राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला असं खातं मिळालं पाहिजे, ज्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात काम करू शकू. आम्ही आमच्या नेत्यांसमोर आमच्या मागण्या ठेवल्या आहेत. आता काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे त्यांच्यावर आहे.
दरम्यान, एनडीएतील आपल्या सहभागावरही मांझी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, हा कुठलाही वाद नाही आहे. त्यामुळे त्यामुळे पाठिंबा देण्यामध्ये किंवा घेण्याच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही नितीश कुमार आणि एनडीएसोबत आहोत. तसेच सोबत राहू. १२ फेब्रुवारी रोजी जी बहुमत चाचणी होईल, त्यामध्ये आम्ही एनडीएसोबत राहू. तसेच या बहुमत चाचणीमध्ये एनडीए निश्चितपणे विजयी होऊ. यात कुठलाही किंतु परंतुचा प्रश्न उपस्थित होत नाही. बिहारमध्ये एनडीएचं सरकार कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे. तर एनडीएकडे १२८ आमदार आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा ६ ने अधिक आहे. जर मांझी यांची नाराजी कायम राहिल्यास त्यांचे ४ आमदार विरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत येथील समिकरणं बदलू शकतात.