नवी दिल्ली - देशात एकमेव पक्ष भाजपाच राहिल, बाकीचे पक्षांचे अस्तित्व संपून जाईल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं होतं. नड्डांच्या या विधानानंतर अवघ्या काही दिवसांतच भाजपला बिहारमधील सत्तेतून पायउतार व्हावे लागले. विशेष म्हणजे बिहारमध्ये बहुतांश प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. केंद्रीय राजकारणाचा विचार केल्या गेल्या वर्षभरात भाजपला बसलेला हा तिसरा धक्का आहे. कारण, शिरोमणी अकाली दल, शिवसेना आणि आता नितीश कुमारांच्या जदयुने भाजपची साथ सोडलीय.
नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपशी काडीमोड घेतला. राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राजकीय भूकंप घडविला. सत्तेच्या सारिपाटावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीसोबत नव्याने डाव मांडल्यानंतर पुन्हा राज्यापलांची भेट घऊन महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या यशस्वी प्रयोगानंतर आता बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपला धक्का दिलाय.
राजधानी दिल्लीत पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी गतवर्षी 2021 मध्ये तीन शेतकरी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवला होता. त्यावेळी, शेतकऱ्यांची बाजू घेत पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने भाजपापासून फारकत घेतली. तत्पूर्वी, 2019 मध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेनंही राज्यातील मुख्यमंत्रीपदावरुन आणि सत्तेतील 50 टक्के वाटा यावरुन भाजपला अडीच वर्षांपूर्वीच सोडचिठ्ठी दिली. आता, 2022 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मोठा गेम करत भाजपला आणि नड्डांच्या विधानाला जोरदार प्रत्त्युतर दिल्याचं दिसून येत आहे. जनता दल युनाटेडने भाजपापासून काडीमोड केला आहे.
एनडीएमध्ये सध्या 14 राजकीय पक्ष
केंद्रात बहुमताचा आकडा गाठलेल्या भाजसोबत एनडीएमध्ये सध्या 14 राजकीय पक्ष आहेत. त्यामध्ये, एआईएडीएमके, एलजेपी, अपना दल (सोनेलाल), नॅशनल पीपुल्स पार्टी, नागालैंडची एनडीपीपी, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा, मिजो नेशनल फ्रंट, नागा पीपुल्स फ्रंट, ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन, आरपीआई (आठवले), असम की एजीपी, तमिळनाडूची पीएमके, तमिल मानीला कांग्रेस आणि आसमची यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल या पक्षांचा समावेश आहे.
नितीश कुमारांकडे स्पष्ट बहुमत
नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे १६४ आमदारांची यादी सादर केली. विधानसभेतील प्रभावी संख्याबळ २४२ असून बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी दुपारी दोन वाजता शपथ घेतील. नितीशकुमार यांनी आज उचललेले पाऊल २०१७ च्या अगदी उलट आहे. त्यावेळी महाआघाडी सोडून एनडीएत सामील झाले होते. त्यांनी नऊ वर्षांत दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडली आहे.
नितीशकुमार यांचे धाडसी पाऊल : तेजस्वी
तेजस्वी यादव यांनी म्हटले की, नितीशकुमार हे देशातील सर्वांत अनुभवी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. आदल्या दिवशी जेडीयूच्या बैठकीत वरिष्ठ नेते उपेंद्र कुशवाही यांनी एक ट्विट करून नितीशकुमार यांचे नवीन आघाडीच्या नेतृत्वासाठी अभिनंदन केले. यातून त्यांनी जेडीयू महाआघाडीत सामील होत असल्याचे संकेत दिले होते.
काँग्रेसचे मानले आभार...
महाआघाडी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे आभार मानले. ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी फोनवरून बोलले. सूत्रांनुसार नितीशकुमार दिल्ली भेटीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.
भाजपचा आरोप...
नितीशकुमार यांनी जनादेशाचा विश्वासघात केला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी जेडीयूने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपने केला.
विधानसभेतील पक्षीय बलाबलएकूण संख्या : २४३प्रभावी सदस्य संख्या : २४२ (राजदचा एका सदस्य अपात्र)
बहुमताचा आकडा : १२२
महाआघाडीचे संख्याबळ जेडीयू- ४६ (४५ आमदार, एक अपक्षराजद ७९, काँग्रेस १९, भाकपा-माले १२, भाकपा ०२, माकप ०२, हिंदुस्तानी अवाम मोर्चा ०४ (एकूण १६४)भाजप : ७७ । एआयएमआयएम : ०१