इंडिया आघाडीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या काही वेगळ्यात हालचाली सुरु असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. अशातच नितीश कुमार यांच्याबाबत आज एक विचित्र घटना घडली आहे. नितीशकुमार जदयूच्या कार्यालयातून अचानक लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतू लालूंनी त्यांना भेट दिली नसल्याचे समोर आले आहे.
नितीश कुमार आज सकाळीच जदयूच्या कार्यालयात आले होते. तिथून ते थेट राबडी देवींच्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांना लालूंची भेट घ्यायची होती, परंतू तेजस्वी यादव आणि राबडी देवींशीच भेट घडवून त्यांना चालते करण्यात आले. लालू प्रसाद यादव तेव्हा घरी नव्हते असे सांगण्यात आले आहे. जवळपास १० मिनिटे नितीशकुमार तिथे थांबले होते.
नितीश कुमार जवळपास 10 मिनिटे येथे थांबले, पण तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. अचानक कुठेही पोहोचणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या नव्या स्टाइलवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार सतत सरकारी कार्यालयांची पाहणी करताना दिसत आहेत. नुकतेच ते सचिवालयात पोहोचले होते. त्यावेळी सचिवालय कार्यालयात कर्मचारी न दिसल्याने ते नाराज झाले होते. यानंतर सीएम नितीश कुमार यांनी अचानक कार्यालयावर छापे टाकण्याची ही मालिका सुरू केली आहे.
नितीश कुमार यांच्या या छापेमारीचा चांगला परिणामही दिसू लागला आहे. आता सचिवालयांचे कर्मचारी वेळेत कार्यालयात येऊ लागले आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नितीशकुमारांनी त्यांचा मोर्चा जदयू कार्यालयावर वळविला होता. तिथे जदयूच्या नेत्यांचीही धावपळ उडाल्याचे दिसून आले आहे.