ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - 1984 चं शीख हत्याकांड आणि 2002 मधल्या गुजरातमधल्या दंगली यामध्ये फरक असल्याचे सांगत, गुजरातमधल्या दंगली सरकारनं घडवून आणल्या होत्या तर 1984 मध्ये जमावानं दंगली घडवल्या असं वादग्रस्त वक्तव्य कन्हय्या कुमारनं सोमवारी केलं आहे. गुजरात दंगलींप्रमाणेच सरकार विद्यापीठांमध्ये गळचेपी करत असल्याचा आरोपही कन्हय्याकुमारनं केला आहे.
आणिबाणी आणि फॅसिझममध्ये फरक असल्याचं मत कन्हय्यानं व्यक्त केलं आहे. आणिबाणीमध्ये फक्त एकाच राजकीय पक्षाचे गुंड गुंडगिरी करतात तर सध्याच्या फॅसिझमच्या अवतारात संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंडागिरी करते असा दावा त्याने केला आहे. पुढे जात 2002 आणि 1984 या दोन्ही दंगलींमध्येही फरक असल्याचे वक्तव्य त्यानं केलं आहे.
जमावानं सामान्य माणसाला मारणं आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत लोकांना मारणं यात फरक आहे असं सांगत 1984 नी 2002 या दोन्ही दंगलींमध्ये हा फरक होता असा त्याचा दावा आहे.
त्यामुळे सध्याच्या जातीय वातावरणात विद्यापीठांवर हल्ले होत आहेत. हिटलरप्रमाणेच मोदीजींना विचारवंतांचा पाठिंबा नसल्याचा दावा त्याने केला आहे. मोदींच्या राजवटीला विचारवंतांचा पाठिंबा नसल्याचं कन्हय्याचं म्हणणं आहे.
हा काळ इस्लामोफोबियाचा असल्याचे सांगत कुठल्याही निष्कर्षाला येण्याआधी इतिहास समजून घ्यायला हवा असंही कन्हय्यानं म्हटलं आहे. ज्यावेळी दहशतवाद नी दहशतवादी असे दोन शब्द येतात त्यावेळी मुस्लीम चेहरा समोर येतो, हा इस्लामोफोबिया असल्याचं सांगत हे दोन्ही शब्द बाजुला ठेवा असं त्यानं सांगितलं आहे.
एका चर्चासत्रात बोलत असताना कन्हय्यानं मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. मात्र, या वक्तव्यांमुळे त्याच्यावरही टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे.