नवी दिल्ली : लैंगिक छळाच्या आरोपाबाबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंचा सामना एका बाहुबली आरोपीशी असून, अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने आंदोलक हैराण आहेत, असे राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी म्हटले. त्यांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ज्येष्ठ वकील सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात कुस्तीपटूंची बाजू मांडत आहेत. त्यांनी ट्वीट केले, “निषेध करणाऱ्या कुस्तीपटूंची दुर्दशा : एक अल्पवयीन आणि इतर सहाजणांचा छळ, एक निर्लज्ज आरोपी, मूक पीएमओ (पंतप्रधान कार्यालय), कोणालाही अटक नाही. “ संथ तपास ? दरम्यान, जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे.
धरणे राजकीय हेतूने प्रेरित : ब्रिजभूषणगोंडा (उत्तर प्रदेश) : नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या विरोधात सुरू असलेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, “आंदोलन करणारे पैलवान काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची खेळणी बनले आहेत’’.
आम्हाला हवा देशाचा पाठिंबा : विनेश फोगाटआमच्या अश्रूंना नाटक संबोधण्यात आले. आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध केला, तर आमच्यावरच उलटसुलट आरोप झाले, अशी व्यथा कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मांडली. आम्हाला देशाच्या पाठिंब्याची गरज आहे, असेही ती म्हणाली. आंदोलनात अन्य महिला कुस्तीपटूंचा सहभाग आहे.