नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर ह्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका होत असल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवत खुलासा मागितला होता. अद्यापही याबाबत प्रज्ञा ठाकूर यांनी उत्तर दिले नसल्याने , भाजप फक्त दिखावा करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा ठाकूर भोपाळमधून निवडून आल्या आहे. प्रचार दरम्यान त्यांनी गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने १७ मे रोजी त्यांना नोटीस पाठवत १० दिवसांच्या आत उत्तर मागितले होते. मात्र १० दिवसांचा कालवधी उलटून ही ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल कोणतेही उत्तर दिले नाही. तर, याविषयी भाजपच्या प्रदेश समितीमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
मध्य प्रदेशचे भाजप प्रवक्ते दीपक विजयवर्गीय यांना विचारले असता ते म्हणाले की, सर्व माहिती पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे आहे. समितीने दिलेला निर्णय आम्ही तुम्हाला सांगू असे म्हणत त्यांनी स्वतःचा बचाव केला आहे. तर १० दिवसात शिस्तपालन समितीचे निर्णय यायला पाहिजे होते, पण तो का आला नाही ते निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल असे ही ते म्हणाले.
यावर प्रतिकिया देताना कॉंग्रेसचे मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधान प्रकरणात भाजप फक्त कारवाई बाबत ढोंग करत आहे. निवडणुकीत पक्षाबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नयेत म्हणून दिखावा म्हणून नोटीस दिली. आता निवडणुका संपताच या प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.