पुडुचेरी : दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत मुख्यमंत्री असलेल्या नारायणसामी यांना काँग्रेसने यंदा विधानसभेची उमेदवारीच दिलेली नाही. आधी त्यांचा मतदारसंघ द्रमुकसाठी सोडला आणि नंतर जी नावे जाहीर झाली, त्या यादीतून नारायणसामी यांचे नाव वगळण्यात आले. नारायणसामी निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या पुडुचेरी दौऱ्यात एका गरीब महिलेने जे तमिळमधून सांगितले, त्याचे नेमके उलट इंग्रजी भाषांतर त्यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पुडुचेरीमध्ये काहीच बदल झालेला नाही, असे ती महिला राहुल गांधींना सांगत होती; पण आपण पुडुचेरीमध्ये समाधानी आहोत, सर्व कामे नीट होत आहेत, असे भाषांतर नारायणसामी यांनी केले. त्यांची ही लबाडी नंतर उघड झाली. त्यामुळे काँग्रेस नेते संतापले.
तेव्हा मुख्यमंत्री पद देण्यास होता विरोधमुळात गेल्या वेळी विधानसभेवर निवडून न आलेल्या नारायणसामी यांना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेस आमदारांचा विरोध होता; पण डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम केले असल्याने नारायणसामी यांना ते पद दिले गेले. त्यानंतर ते सतत नायब राज्यपालांशी संघर्ष करीत राहिले आणि लोकांच्या प्रश्नांकडे मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.