नवी दिल्ली-
कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे (Capacity caps) निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशात आता १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान वाहतूक संपूर्ण प्रवासी क्षमतेनं होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० पासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. पण मे २०२० पासून 'वंदे भारत' मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याशिवाय निवडक देशांशी द्विपक्षीय 'एअर बबल' करार करुन जुलै २०२० पासून विमानसेवा सुरू आहे.
देशांतर्गत विमान वाहतूक सध्या विमानाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ८५ टक्के क्षमतेनं सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार १८ सप्टेंबरपासून देशात ८५ टक्के प्रवासी क्षमतेनं विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती. याआधी ५ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत विमान वाहतूक ६५ टक्के क्षमतेनं, तर १ जून ते ५ जुलैपर्यंत ५० टक्के प्रवासी क्षमतेनं सुरू होती. आता प्रवासी क्षमतेवर असलेले निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.