नवी दिल्ली, दि. 26 - इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले. जर त्यांच्याविषयी माहिती नाही तर त्यांना मृत घोषित का करण्यात येत नाही असा सवाल मला विचारण्यात येतोय. मात्र पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे हे पाप आहे आणि ते पाप मी कधीही करणार नाही, असेही सुषमा यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहराची नुकतीच मुक्तता करण्यात आली आहे. येथूनच तीन वर्षांपूर्वी 40 भारतीयांचे अपहरण झाले होते. त्यातील एका अपहृताने स्वत:ची सुटका करून घेतल्यावर ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, तीन वर्षे लोटल्यानंतरही या भारतीयांबाबत पुरेशी माहिती सरकारला मिळालेली नाही. याबाबत संसदेत माहिती देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, मोसूलमधील 39 भारतीयांबाबत मी ते जिवंत आहेत किंवा मृत याबाबत कधीही वक्तव्य केलेले नाही. प्रत्येक वेळी सभागृहाला विश्वासात घेत मी पुढे पाऊल टाकले." परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज विरोधी पक्षांची दिशाभूल करत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. मोसूलमधील भारतीयांप्रकरणी मी दिशाभूल करत असल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. पण मी खरोखरच दिशाभूल करतेय का? मी कधी सांगितले की ते जिवंत आहेत? मग मी त्यांना मृत घोषित का करत नाही, असा सवाल विचारला जात आहे. पण पुराव्याविना कुणालाही मृत घोषित करणे पाप आहे. ते पाप मी कधीही करणार नाही. "या प्रकरणात केवळ एक व्यक्ती सांगतेय की त्यांची हत्या झाली. तर आमची सहा सूत्रे सांगतात की त्यांना मारण्यात आले नाही. मग तुम्हीच सांगा मी काय केले पाहिजे. तसेच संबंधितांपर्यंत माझा थेट संपर्क झालेला नाही. त्यांच्या जिवंत असल्याचाही काही पुरावा नाही. जेव्हा त्यांच्याबाबत काही सबळ पुरावा मिळेल तेव्हा मी सभागृहात येऊन माहिती देईन," असे सुषमा यांनी सांगितले.
त्यांना मृत घोषित करण्याचे पाप करणार नाही, मोसूलमधील भारतीयांबाबत सुषमांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 4:06 PM