मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासू देशात दररोज एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र आता यासंदर्भात लॅन्सेटचा एक अहवाल समोर आला आहे.
वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित लॅन्सेट मासिकानं एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही, असं लॅन्सेटनं अहवालात म्हटलं आहे. लॅन्सेट कोविड १९ कमिशन इंडिया टास्क फोर्सनं भारतात बालरोग कोविड-१९ विषयासंदर्भात देशातील प्रमुख तज्त्रांच्या एका गटाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एक अहवाल तयार केला.
कोरोनाची लागण झालेल्या अनेक लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. बऱ्याचशा मुलांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं दिसून येतात. लागण झाल्यानंतर अनेकांना ताप आणि श्वासाशी संबंधित त्रास होतात. लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यावर उलटी, पोटदुखी आणि जठराशी संबंधित त्रास जाणवू लागतात, असं लॅन्सेटनं अहवालात नमूद केलं आहे.
दहा वर्षांखालील कोरोना बाधितांमधील मृत्यूदर २.४ टक्के इतका आहे. कोरोनामुळे जीव गमावलेली ४० टक्के लहान मुलं गंभीर आजारांनी ग्रस्त होती. लॅन्सेटनं केलेल्या संशोधनात एम्सच्या बालरोगतज्ज्ञ शेफाली गुलाटी, सुशील के. काबरा आणि राकेश लोढा यांच्यासारख्या ख्यातनाम डॉक्टकांनी सहभागी घेतला. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत रुग्णालयाची गरज भासणाऱ्या लहान मुलांची संख्या ५ टक्क्यांहून कमी असेल. तर मृत्यूदर २ टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती त्यांनी दिली.