नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून त्यांना देशापुढे उघडं पाडण्यासाठी काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाचा घाट घातला आहे. पण, प्रत्येक पक्षाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मिळालेला वेळ पाहता, भाजपासाठीच आजचा दिवस 'अच्छा दिन' ठरू शकतो, असं दिसतंय.
संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होते, तेव्हा पक्षीय बलाबल पाहून वेळ वाटून दिला जातो. त्यानुसार, काँग्रेसचे ४८ खासदार असल्यानं त्यांना ३८ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. त्या खालोखाल अण्णा द्रमुकला (३७ खासदार) २९ मिनिटं, तृणमूल काँग्रेसला (३४ खासदार) २७ मिनिटं, बीजू जनता दलाला १५ मिनिटं आणि तेलंगणा राष्ट्र समितीला ९ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. याउलट, २७३ सदस्य असलेल्या भाजपाला तब्बल ३ तास ३३ मिनिटं मिळाली आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी भाजपाकडे भरपूर वेळ आहे.
गेल्या चार वर्षांत, लोकसभेत जेव्हा महत्त्वाच्या विषयांवरून चर्चा झाल्यात, तेव्हा भाजपाचे संबंधित मंत्री आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही धडाकेबाज भाषण करून भाव खाऊन गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज काँग्रेस आणि अन्य विरोधक त्यांच्यावर सरशी साधतात का, यावर बरंच काही ठरणार आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून, २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा प्रयत्न सरकार आणि विरोधक करतील, असं मानलं जातंय. त्यात कोण बाजी मारतं, हे पाहावं लागेल.