Parliament No-confidence Motion Debate Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; अधीर रंजन चौधरींचं निलंबन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:10 PM2023-08-08T13:10:35+5:302023-08-10T19:26:53+5:30

आज सुरु झालेली चर्चा १० ऑगस्टपर्यंत चालेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील.

No confidence motion Debate in lok sabha live updates parliament monsoon session trust vote pm Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Gaurav Gogoi Bjp Congress latest updates | Parliament No-confidence Motion Debate Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; अधीर रंजन चौधरींचं निलंबन

Parliament No-confidence Motion Debate Live: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; अधीर रंजन चौधरींचं निलंबन

googlenewsNext

नवी दिल्ली - मणिपूर हिंसाचारावरून संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे गौरव गोगाई यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील अनेक खासदारांनी आपलं मत मांडले. यावेळी दोन्हीकडील खासदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले मंगळवारी सुरु झालेली चर्चा आज १० ऑगस्टला संपण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या आरोपांना लोकसभेत उत्तर देणार आहेत. 

LIVE

Get Latest Updates

07:32 PM

संसदेचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. आवाजी मतदानाने मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यानंतर संसदेचे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

07:28 PM

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

विरोधी पक्षांच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
 

07:23 PM

... तर ही आमची कमिटमेंट आहे - नरेंद्र मोदी

सबका साथ सबका विकास हा आमचा फक्त नारा नाही तर ही आमची कमिटमेंट आहे. ईशान्य भारताला आजवर जे मिळालं नाही ते देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

07:20 PM

काँग्रेसच्या काळात मणिपूरच्या नागरिकांवर अत्याचार झाले - नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या काळात मणिपूरच्या नागरिकांवर अत्याचार झाले. १९२६ च्या भारत चीन युद्धावेळी पंडित नेहरू रेडिओवरून काय बोलले होते? आसामच्या जनतेला त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिलं होतं. जाणूनबुजून त्यांनी त्या भागाचा विकास केला नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच, पुर्वोत्तर राज्यातील समस्याचं कारण काँग्रेस आहे. आमच्या सरकारने पुर्वोत्तर राज्यातील विकासांचं काम हाती घेतलं. आमचं सरकार या राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

07:01 PM

ईशान्य भारताचा विकास नेहरूंनी केला नाही, असा आरोप लोहियांनी केला होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

06:58 PM

अकाल तख्तवर हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

06:57 PM

त्या कृत्याला काँग्रेसला कधीही पश्चात्ताप झाला नाही. १९६२ मध्ये रेडिओवरून पंडित नेहरूंनी केलेले भाषण आसामच्या लोकांच्या मनात शल्याप्रमाणे टोचत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:55 PM

ही बाब काँग्रेसने कधीही देशासमोर आणू दिली नाही. त्यावेळेस पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

06:54 PM

ती वायुसेना दुसऱ्या देशाची होती का, ते दुःख आजही मिझोरममध्ये स्मरण केले जाते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

06:53 PM

५ मार्च १९६६ रोजी मिझोरममध्ये काँग्रेसने असहाय्य नागरिकांवर वायुसेनेच्या माध्यमांतून हल्ले केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:52 PM

काँग्रेसचा इतिहास भारत मातेच छिन्नविछिन्न करण्याचा राहिलेला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

06:50 PM

देशाचे तुकडे होण्याबाबतच्या घोषणा दिल्या गेल्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:48 PM

सत्तासुखाशिवाय हे जीवंत राहू शकत नाही का, असा प्रश्न पडतो. भारत मातेच्या हत्येची कामना करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:47 PM

तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. विकासाच्या मार्गावर पुन्हा मार्गक्रमण करेल, त्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:46 PM

मणिपूर पुन्हा उभा राहील. मणिपूरमधील माता-भगिनींना विश्वास देतो की संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:45 PM

न्यायालयाचा एक निकाल आला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महिलांशी झालेला प्रकार दुर्दैवी, दोषींवर सर्वांत कठोर कारवाई होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:44 PM

अमित शाहांनी दोन तास मणिपूरच्या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. देशातील जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. मणिपूरवासीयांना चांगला संदेश आणि विश्वास दाखवायचा प्रयत्न होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:43 PM

मणिपूरविषयी चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी पत्र दिले होते. मात्र, ती हिंमत विरोधकांनी दाखवली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

06:42 PM

मणिपूरविषयी विरोधकांना चर्चा करायची नाही. अमित शाह यांनी विरोधकांना आवाहन केले होते. मणिपूरच्या प्रस्तावावर चांगली चर्चा होऊ शकली असती : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:41 PM

विरोधकांना ऐकून घ्यायची सवय नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

06:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच विरोधकांचा सभात्याग
 

06:40 PM

घमंडिया आघाडीमुळे देश दोन दशके मागे जाईल. मात्र, देशाला टॉप तीनमध्ये आणण्याची माझी गॅरंटी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:39 PM

घमंडिया आघाडीला देशाचा विकास नको. शक्य नसलेले वायदे जनतेशी करत आहे, अशाने अर्थव्यवस्था खाली जाईल. अशाने देश दिवाळखोरीच्या दिशेने जाईल, हा इशारा देशवासीयांनी वेळीच ओळखावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:36 PM

काँग्रेसने कितीही नवी दुकाने उघडली, तरी त्याला कुलुप लावावे लागणार आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:31 PM

काँग्रेसची मजबुरी मला माहिती आहे. फेल प्रॉडक्टला सारखे सारखे लॉन्च केले जाते : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:26 PM

टीका करताना अनेकदा खरेही तोंडातून बाहेर पडते. लंका हनुमंतांनी नाही तर गर्वामुळे जळाली. काँग्रेसच्या गर्वामुळेच ४०० च्या ४० जागा झाल्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:24 PM

आमच्या सरकारने दिल्लीत पीएम म्युझियम बनवले. सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:22 PM

या दरबारीपणामुळे अनेकांचे हक्क नाकारण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. कपड्यांवरून वाईट बोलायचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:21 PM

काँग्रेसला घराणेशाही आणि दरबारीपणा खूप आवडतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:20 PM

घमंडिया गठबंधन घराणेशाहीचे सर्वांत मोठे प्रतिबिंब आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनायक जनप्रकाश, डॉ. लोहिया यांसारख्यांनी घराणेशाहीचा विरोध केला. घराणेशाहीमुळे सामान्य जनतेचे अधिकार नाकारले जातात : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:18 PM

बाहेरून लेबल बदलले तरी जुन्या पापांचे तुम्ही काय करणार, जनता जनार्दनपासून ही पापे तुम्ही लपवू शकत नाही  : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:16 PM

हे इंडिया नाही, घमंडिया गठबंधन आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

06:15 PM

काँग्रेस पक्षही त्यांचा स्वतःचा नाही, निवडणूक चिन्हही बदलली गेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:13 PM

काँग्रेसकडे स्वतःची अशी कोणतीच गोष्ट नाही, निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत यांचे स्वतःचे असे काहीच नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:12 PM

रस्ते असो, मैदाने असो, विमानतळे असो, गरिबांसाठीच्या योजना असो, स्वतःची नावे दिली आणि त्यात घोटाळे गेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:11 PM

तामिळनाडूतील मंत्र्यांनी भारतात नसण्याबाबत विधाने केली. मात्र, तामिळनाडूचा आम्हाला अभिमान आहे. अनेक रत्न त्या मातीने देशाला दिली आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:09 PM

I.N.D.I.A. असे नवे नामकरण करून इंडियाचे तुकडे केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:08 PM

काँग्रेसची अशी अवस्था आहे की, स्वतः जिवंत ठेवण्यासाठी NDAचा आधार घ्यावा लागला. मात्र, गर्व इतका जास्त आहे की, NDA मध्ये दोन I घुसवले : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:06 PM

विरोधकांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्यांच्या पाठीमागून चालत आहात, त्यांना देशाचे संस्कार नकोत. माहिती नाही, लाल मिरची आणि हिरवी मिरची यातला फरक कळत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:04 PM

विरोधकांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. बंगळुरूत दीड ते दोन दशकांपासून असलेल्या UPA वर पाणी सोडले. तेव्हा UPA चे क्रियाकर्म केले. तेव्हाच संवेदना व्यक्त करायला हव्या होत्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

06:02 PM

१९८८ मध्ये नागालँडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर आता तिथे सत्ता नाही. तेव्हापासून जनता काँग्रेसविषयी अविश्वास दाखवत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:01 PM

पश्चिम बंगाल तसेच ओडिशामध्येही काँग्रेसबाबत जनतेचा अविश्वास दिसला : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

06:00 PM

१९८५ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. गेल्या ३८ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता तिथे नाही. तिथेही काँग्रेसबाबत अविश्वास आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:59 PM

६१ वर्षांपासून काँग्रेसची तामिळनाडूत सत्ता नाही. देशातील जनतेचा काँग्रेसबाबतचा अविश्वास वाढत चालला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:58 PM

काँग्रेस स्वतःच्या अहंकारात एवढी आकंठ बुडालेली आहे की, त्यांना जमिनीवर काय चालले आहे हेही दिसत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:57 PM

भारताने तयार केलेल्या लसींवर जगातील अनेक देशांनी विश्वास ठेवला, अनेक देशांना भारताने लसपुरवठा केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

05:57 PM

कवडीमोलाची किंमत नसलेल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही काँग्रेसची वृत्ती आहे. भारताने लस निर्मिती केली. मात्र, यांना त्यावरही विश्वास नाही. त्यांना परदेशी लसींवर जास्त विश्वास होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:55 PM

पाकिस्तान वारंवार येऊन सीमेवर कारवाया करायचा. मात्र, पाकने हे कधीही स्वीराकले नाही. पाकिस्तानवर यांचे एवढे प्रेम आहे की, पाक म्हणेल ते खरे मानत होते. यांच्यामुळे काश्मिर खोऱ्यात अशांतता राहिली. मात्र, भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र, जवानांच्या शौर्यावरही यांना विश्वास नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:54 PM

काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचा हा इतिहास आहे की, त्यांना देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास राहिला नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

05:53 PM

लाल किल्ल्यावरून भाषणावर टीका केली, जनधन खात्याच्या योजनेवर टीका केली. आयुर्वेद, योग यांवरही टीका केली. स्टार्टअपबाबत नकारात्मकता पसरवली गेली. मात्र, या योजना यशस्वी होताना दिसत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:51 PM

२०२८ मध्ये जेव्हा तुम्ही अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणाल, तेव्हा देश जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर असेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:50 PM

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म आणि कठोर परिश्रम यांमुळे देश या उंचीवर पोहोचला आहे आणि पुढेही जाईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:48 PM

जबाबदार विरोधक योग्य पद्धतीने प्रश्न विचारतात, हे तुम्ही कसे करणार, तुमचा रोडमॅप काय, असे कधी विचारले नाही. काही सल्ले, सूचना दिल्या असत्या. मात्र, तसे काही केले नाही. विरोधकांकडे कल्पना दारिद्र्य आहे. तेही मलाच शिकवावे लागणार आहे का: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:46 PM

काही दिवसांपूर्वी मी म्हटले होते की, तिसऱ्या टर्ममध्ये देश तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असेल, देशाच्या उज्ज्वल भविष्यावर आमचा विश्वास आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:45 PM

देशाबाबतही विरोधक अनेक वावड्या उठवत आहेत. मात्र, देश आणखी मजबूत होत आहे. आम्हीही मजबूत होत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:44 PM

LICबाबत अनेक गोष्टी पसरवल्या गेल्या. गरिबांचे नुकसान केले जात आहे. गरिबांचे पैसे बुडवले, नाही नाही ते आरोप केले गेले. मात्र, LIC मजबूत झाली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:43 PM

आजच्या घडीला HAL यशाचे नवे टप्पे गाठत आहे. आतापर्यंत सर्वाधिक महसूल HAL ला मिळाला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:41 PM

HAL बाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या. डिफेन्स क्षेत्र समाप्त झाले, अशा वावड्या उठवल्या गेल्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:40 PM

बँकिग क्षेत्र बुडेल, देश बरबाद होईल आणि काय काय सांगितले. विरोधकांनी परदेशातून अनेक तज्ज्ञ बोलावले. बँकांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या मात्र, आपल्या देशातील बँकिंग व्यवस्था सुधारली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:39 PM

विरोधकांना एक रहस्यमयी वरदान लाभले, असा माझा विश्वास होत चालला आहे. विरोधकांनी ज्यांच्यावर टीका केली, त्यांचे भलेच झाले आहे. माझेच उदाहरण घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:38 PM

विरोधकांनी खूप अपशब्द वापरलेत. मोदी तेरी कब्र खुलेगी हा विरोधकांचा आवडता नारा आहे. मात्र, विरोधकांची टीका ही माझ्यासाठी टॉनिक आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:37 PM

जेव्हा जेव्हा चांगले घडत असते, शुभ होत असते, तेव्हा एक काळा टिका लावावा, असे पूर्वज सांगत असत. आज जे जे देशात चांगले होत आहे, त्याला काळा टिका लावण्याचे काम विरोधकांनी अविश्वासाचा ठराव आणून केलेय: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:35 PM

जागतिक स्तरावरील अनेक संस्थांचे अहवाल असले तरी देशातील विरोधकांना त्यांच्यावर विश्वास नाही, जग जे लांबून पाहत आहे, मात्र, विरोधकांना ते दिसत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:33 PM

स्वच्छ भारत अभियानामुळे ३ लाख लोकांचे जीव वाचले, असेही जागतिक आरोग्य संघटना म्हणतेय : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:33 PM

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की जलजीवन मिशनमुळे ४ लाख लोकांचे जीव वाचले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:32 PM

साडे तेरा कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले आहे, असा नीती आयोगाचा अहवाल आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:31 PM

अनेक विक्रमासह देशातील स्टार्टअप जगासमोर जात आहेत, निर्यातीत नवे विक्रम प्रस्थापित केले जात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:30 PM

देशाची प्रतिमा जगात मलिन करण्याचे प्रयत्न झाले, मात्र, जगाला आता भारताची ताकद कळली आहे, भारतावर जगभरात विश्वास दाखवला जात आहे आणि तो वाढतोय : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:29 PM

या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की, तरुणांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:28 PM

२०१४ ला पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:27 PM

या कालखंडात आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. यासाठी देशाचा विकास हेच आपले ध्येय हवे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

05:26 PM

आगामी काळात जे जे देशात घडेल, त्याचा प्रभाव एक हजार वर्षे देशावर राहील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:25 PM

आताचा काळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:25 PM

जिनके खुद के बहीखाते बिगड़े है, वो मेरा हिसाब लिए फिरते हैं; PM मोदींचा विरोधकांना टोला

05:24 PM

काँग्रेस वारंवार अधीर रंजन चौधरी यांचा अपमान करत आहे, आमची पूर्ण संवेदना अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:23 PM

अधीर रंजन चौधरी यांना बोलण्याची संधी देऊनही त्याची माती कशी करावी, हे यांच्याकडून शिकावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:22 PM

सर्वांत मोठ्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे अविश्वास ठराव प्रस्तावाच्या यादीत नावच नाही, अनेक नव्या गोष्टी यावेळी समोर आल्या, ज्याची कल्पनाही कधी केली नव्हती: पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 

05:20 PM

अविश्वासाच प्रस्तावाचा ठराव आणण्यासाठी ५ वर्षे दिली होती, मात्र तरीही तुम्ही अभ्यास करून आला नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:20 PM

विरोधकांनी फिल्डिंग लावली, तरी बॅटिंग सत्ताधाऱ्यांनी केली. यांनी केवळ नो बॉल टाकले, खरे सिक्सर सत्ताधारी बाकांवरून लगावण्यात आले: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:18 PM

विरोधकांना सत्तेची भूक आहे, तरुणांच्या भविष्याची चिंत नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:17 PM

देशापेक्षा विरोधकांना त्यांचा पक्ष मोठा वाटतोय, विरोधकांना जनतेच्या भुकेची नाही, तर स्वतःच्या पक्षाच्या भविष्याची चिंता आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:16 PM

अनेक विधेयकांवर चांगल्या पद्धतीने चर्चा होऊ शकली असती मात्र, विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:13 PM

विरोधकांचा प्रस्ताव आमच्यासाठी शुभ, आगामी निवडणुकांतही आम्ही प्रचंड बहुमताने येऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:13 PM

केवळ सभागृहात नाही, तर प्रत्यक्ष देशवासीयांसमोर आम्ही गेलो, तेव्हा जनतेने विरोधकांवर अविश्वास दाखवला. केवळ भाजप नाही, तर एनडीएच्या जागा वाढल्या:पंतप्रधान नरेंद्र मोदी

05:12 PM

२०१८ मध्येही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव ही आमची बहुमत चाचणी नाही, विरोधकांची होती :पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:11 PM

कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देव आपली इच्छा पूर्ण करून घेतो. विरोधकांना बुद्धी झाली आणि त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला:पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:10 PM

देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास दाखवला, त्याबाब त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे:पंतप्रधान नरेंद्र मोदी 

05:06 PM

अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात उत्तर देणार

03:48 PM

तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होईल, भारत विश्वगुरू म्हणून पुन्हा उदयाला येईल:ज्योतिरादित्य शिंदे

03:39 PM

तुष्टीकरणामुळे नाही तर संतुष्टीकरणामुळे शेतकऱ्यांना योजना आणि दिलासा: ज्योतिरादित्य शिंदे

03:31 PM

अरुणाचल प्रदेशमध्ये आता १७ विमानतळे आहेत, ईशान्य भारतात विकासाचा नवा उदय पंतप्रधान मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांच्या काळात झाला: ज्योतिरादित्य शिंदे

03:30 PM

मोदी सरकारच्या काळात रस्ते विकास, रेल्वे विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतात सुधारणा झाली: ज्योतिरादित्य शिंदे

03:29 PM

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मेघालयला १०० वर्षांनी पहिले रेल्वे स्टेशन मिळाले: ज्योतिरादित्य शिंदे

03:28 PM

सीमाभागातील गावात विकास झाला, तर तेथे जागरुकता निर्माण होईल, म्हणून इतके वर्ष तिथे काहीच केले नाही: ज्योतिरादित्य शिंदे

03:27 PM

तुम्ही आकडे काढून पाहा. अनेक विकासाची कामे झालीत. गेल्या ९ वर्षांत मणिपूरमध्ये सर्वाधिक शांतता: ज्योतिरादित्य शिंदे

03:24 PM

काँग्रेसच्या तुष्टीकरणामुळे मणिपूरमध्ये अशांतता आणि हिंसाचाराला सुरुवात: ज्योतिरादित्य शिंदे

03:15 PM

विरोधकांचा दुटप्पीपणा देशासमोर आला आहे; ज्योतिरादित्य शिंदेंची लोकसभेत टीका

03:14 PM

गृहमंत्री अमित शाह मणिपूर चर्चेसाठी तयार आहेत. मात्र, विरोधकांनी तशी तयारी दाखवली नाही. १९९३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचारात ७५० जणांचा मृत्यू झाला होता. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी लोकसभेत मौनव्रत का धारण केले होते? ज्योतिरादित्य शिंदेंचा सवाल

03:12 PM

विरोधकांना मणिपूरची चिंता नाही, राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्यात: ज्योतिरादित्य शिंदे

ज्या शब्दांत टीका केली, आतापर्यंत सभागृहात झालेली नव्हती. सगळा देश काँग्रेसचे वागणे पाहत आहे. मणिपूरवर चर्चा करायची नाही. मणिपूरची चिंता नाही. यांना केवळ आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. यांना ऐकून घ्यायची सवय नाही; ज्योतिरादित्य शिंदेंची टीका

03:10 PM

पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कोणाच्याही पदाची काँग्रेसच्या सदस्यांना चिंता नाही. यांना आपली चिंता आहे; ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेत आक्रमक

03:09 PM

पंतप्रधानांवर अशा प्रकारचे आरोप करणे अत्यंत चुकीचे; प्रल्हाद  जोशी यांची काँग्रेस सदस्यांवर टीका

03:06 PM

अधीर रंजन चौधरींनी माफी मागितली पाहिजे; भाजपचे सदस्य लोकसभेत आक्रमक

03:05 PM

अधीर रंजन चौधरी यांचे विधान कामकाजातून काढले

अधीर रंजन चौधरी यांच्या नीरव मोदींवरून केलेल्या विधानामुळे लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. ते विधान कामकाजातून काढून टाकण्यात आले.

03:03 PM

अविश्वासाच्या ठरावामुळे पंतप्रधान मोदी संसदेत आले: अधीर रंजन चौधरी

अविश्वास प्रस्तावामुळे पंतप्रधान मोदी संसदेत आले. ही या प्रस्तावाची ताकद आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेत येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर बोलावे, अशी आमची मागणी होती. आम्ही भाजपच्या कोणत्याही सदस्याला संसदेत येण्याची मागणी करत नव्हतो, आम्ही फक्त आमच्या पंतप्रधानांनी येण्याची मागणी करत होतो, असे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले.
 

01:58 PM

मुस्लिमांविरोधात देशात द्वेष पसरवला जातोय - ओवैसी

ट्रेनमध्ये लोकांची ओळख करून त्यांना मारले जाते. देशात राहायचे असेल तर मोदींना मत द्यावे लागेल असं धमकावतात. हे आपल्या देशात काय चाललंय? लोक कपडे, दाढी पाहून मारले जातात. नूंहमध्ये मुस्लिमांची घरे पाडली. मुस्लिमांसाठी द्वेष पसरवला जात आहे. हिजाबचा मुद्दा पुढे करून शिक्षणापासून तोडले जाते. चीन आपल्या देशात घुसून बसलाय त्यावर तुम्ही काही बोलत नाही -  असादुद्दीन ओवैसी(AIMIM)

 

01:45 PM

तुमच्या राजकारणानं देशाचं नुकसान होतंय - ओवैसी

बिलकिस बानो या देशाची मुलगी होती का नाही? ज्या ११ जणांनी तिच्यावर बलात्कार केला, तिचा खून केला. तिच्या गुन्हेगारांची सुटका केली. शी जिनपिंगला अहमदाबादला बोलावून पाहुणचार केला होता. आज चीन सीमेवर काय सुरू आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानात आहे त्यांना परत का आणले जात नाही. स्वत:ला विश्वगुरू म्हणतात मग कुठे आहे कुलभूषण जाधव? या देशाला द्वेषाच्या राजकारणात ओढू नका, अल्पसंख्याकांचा बजेट ४० टक्क्यांनी कमी केले. फेलोशिप कमी केली. उच्च शिक्षणापासून मुस्लीम समाजातील तरूणाला वंचित ठेवले. मोदी सरकारमध्ये एकही मुस्लीम नाही हा कुठला न्याय? क्विट इंडियाचा नारा एका मुस्लीमाने दिला होता तोदेखील तुम्ही नाकारता. चायना क्विट इंडिया करा, तुष्टीकरणाचे राजकारणाला क्विट इंडिया करा. तुमच्या राजकारणाने देशाचे नुकसान होतंय, देश मोठा आहे की हिंदुत्व याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे, जर तुम्ही अन्यायाविरोधात आवाज उचलला नाही तर तुमचं राजकारण चालणार नाही -  असादुद्दीन ओवैसी(AIMIM)

 

01:25 PM

सीतारामन यांच्या भाषणावेळी विरोधकांचा सभात्याग

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डीएमकेच्या खासदारांचा सभात्याग 

01:22 PM

नाफेडद्वारे टॉमेटो खरेदी करणार - निर्मला सीतारामन

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील टोमॅटो उत्पादक प्रदेशांमधून टोमॅटोची खरेदी आणि NCCF, NAFED सारख्या सहकारी संस्थांद्वारे होणार आहे. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान इथं १४ जुलैपासून सुरू झाले आहे आणि हे सुरूच राहणार आहे. तसेच दिल्लीत, NCCF, NAFED आणि केंद्रीय भंडारचे आउटलेट मोबाईल व्हॅनचे वितरण केले जात आहे – निर्मला सीतारामन

12:52 PM

पब्लिक सेक्टर बँकांचा नफा वाढला - सीतारामन

आमच्या पब्लिक सेक्टर बँक १ लाख कोटीहून अधिक नफा कमावत आहेत. बँकांकडून जो डिव्हिडेंट सरकारला पोहचते त्यातून जनहिताची कामे केली जाते. एसबीआय पहिल्या आर्थिक तिमाहीत सर्वाधिक कमाई केलेली बँक आहे. - निर्मला सीतारामन

12:38 PM

UPA विरोधात जनतेनेच अविश्वास आणलाय - निर्मला सीतारामन

१ दशक यूपीए सरकारने व्यस्त केले. भ्रष्टाचाराने सर्व काळ घालवला. जनतेने यूपीएविरोधात २०१४ आणि २०१९ मध्ये अविश्वास आणून त्यांना हरवलं. तीच परिस्थिती आता २०२४ मध्ये होणार आहे. विरोधक आमच्याविरोधात लढतायेत की एकमेकांविरोधात हे कळत नाही. ही अजब आघाडी आहे- निर्मला सीतारामन 

12:33 PM

ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर

कृषीवर अनेक नेते बोलत होते. २०१४ मध्ये कृषी बजेट २१ हजार कोटी होते आज १ लाखाहून अधिक बजेट झालंय. संरक्षण खात्याला १९४१ कोटी होते आज १६ हजार कोटी बजेट झाले. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे २०१४ मध्ये कठीण होते. आता सहज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. आज ३ कोटीहून अधिक घरात पाणी पोहचले आहे. देशात नवे जलवाहतूक पर्याय सुरू झाले. ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत १० व्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. – निर्मला सीतारामन

12:25 PM

काँग्रेसनं जनतेला खोटी स्वप्न दाखवली, आम्ही स्वप्न साकारलंय - निर्मला सीतारामन

गरिबी हटाओ असा नारा काँग्रेसनं दिला, पण खरोखर गरीबी हटली का? आता देशात परिवर्तन घडत आहे. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. यूपीएच्या काळात वीज येईल म्हटलं जायचं आता वीज आलीय, गॅस कनेक्शन मिळेल आता मिळालं आहे. पीएम आवास घर बनेल म्हणायचे आता घर बनलेत. स्वस्त औषधे आणि स्वास्थ सुविधा मिळाल्या आहेत. तोंडी आश्वासने देऊन काँग्रेसनं जनतेला स्वप्न दाखवली पण आम्ही जनतेची स्वप्न साकार करतोय – निर्मला सीतारामन, मंत्री

11:50 AM

दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित

11:11 AM

पंतप्रधान मोदी सर्व प्रश्नांना उत्तर देतील ही अपेक्षा - ठाकरे गट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत येऊन मणिपूरवर बोलायला हवं ही त्यांची जबाबदारी आहे. पण ते करत नाही. त्यामुळेच आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत या सर्व प्रश्नांना पंतप्रधान मोदी आज उत्तर देतील अशी अपेक्षा आहे – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, ठाकरे गट

11:05 AM

"२ तासाच्या भाषणात जनतेच्या प्रश्नाला उत्तरच नाही"

२ तासाच्या दिर्घ भाषणात गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील जनता जो प्रश्न विचारतेय त्याला उत्तरच दिले नाही. देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कधी हमी देणार? – प्रमोद तिवारी, खासदार, काँग्रेस

08:38 AM

पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देणार

07:11 PM

परिस्थितीमुळे मणिपूरमध्ये हिंसाचार - अमित शाह

मणिपूरमधील हिंसाचार ही त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे, त्याला राजकारणाचा मुद्दा बनवू नये, असे अमित शाह म्हणाले. पुढे अमित शाह म्हणाले की, विरोधक म्हणतात की मोदींना पर्वा नाही. मला सांगायचे आहे की 3, 4 आणि 5 मे रोजी पंतप्रधान सतत सक्रिय होते. 3 मे रोजीच तेथे हिंसाचार सुरू झाला. रात्री 4 वाजता मोदींनी माझ्याशी मणिपूरला फोनवर चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पुन्हा फोन करून मला उचलून चर्चा केली. आम्ही तीन दिवस सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स की. हवाई दल वापरले. डीजीपी बदलले.
 

07:08 PM

...म्हणून मुख्यमंत्री बदला नाही

ही परिस्थितीजन्य हिंसा आहे, याच्यावर राजकारण होता कामा नये, अशा शब्दांत शहांनी यावेळी मोदींबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर दिले. जेव्हा कुठल्याही राज्यांत कलम 356 लावतात, जेव्हा तिथले काम ठप्प झालेले असते. पण तिथं मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकार्य करत आहेत, मग मुख्यमंत्री कसा बदलणार? असे अमित शाह म्हणाले.

07:00 PM

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - अमित शाह

हा अविश्वास प्रस्ताव पडणार आहे आणि पुन्हा मोदी पंतप्रधान होतील. तुम्ही अविश्वास म्हणा पण लोकांच्या मनात मोदींबद्दल विश्वास आहे, अशा विश्वास यावेळी शहांनी व्यक्त केला. नॉर्थ ईस्टमध्ये हिंसा कमी झाल्याचाही दावा अमित शाह यांनी केला.

06:59 PM

मणिपूरच्या घटनांवर राजकारण करणं लाजीरवाणं - अमित शाह

मणिपूरमध्ये जी घटना घडली त्याच्यावर मी सवित्तर बोलू इच्छितो. विरोधी पक्षाच्या मणिपूरमधील मुद्याशी मी सहमत आहे. घडलेली घटना लाजीरवाणी आहे पण यावर राजकारण करणं त्यापेक्षाही लाजीरवाणं आहे, असे अमित शाह म्हणाले

06:47 PM

विरोधकांचा मोदींवर विश्वास नसला तरी गरीबांचा त्यांच्यावर विश्वास- अमित शाहांचा विश्वास

"कोरोनाच्या काळात अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी जनतेला सांगितले की ही मोदी लस घेऊ नका. पण जनतेने मोदींवर विश्वास दाखवला आणि सगळे डोस घेतले. लॉकडाऊनलाही काँग्रेसने विरोध केला. विरोधी पक्ष म्हणाले की लॉकडाऊन लादले तर गरीब काय खातील. पण आम्ही लॉकडाऊन लादून गरीबांना उपाशी ठेवलं नाही. विरोधी पक्षांचा मोदींवर विश्‍वास नसला तरी देशातील जनतेचा विश्‍वास आहे" असे शाह म्हणाले

06:30 PM

अमित शाहांनी सांगितली अविश्वास प्रस्तावाची ३ उदाहरणं

अमित शहा म्हणाले, अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. 1993 मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. 2008 मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९ मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला.

05:59 PM

"काँग्रेसच्या नुसत्या घोषणा, भाजपाकडून योजनांची अंमलबजावणी", अमित शाहांचा हल्लाबोल

"काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिली होती, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या समजल्या. पंतप्रधान मोदींनी 9 वर्षांत 11 कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. लोक क्लोराईडयुक्त पाणी पितात. मोदींनी हर घर जल योजनेतून १२ कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणले. काँग्रेस कर्जमाफीसाठी लॉलीपॉप देत असे, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसने नुसत्या घोषणा केल्या, पण भाजपाने अंमलबजावणी केली", असे अमित शाह म्हणाले.

05:41 PM

अमित शाहांनी सांगितली अविश्वास प्रस्तावाची ३ उदाहरणं

अमित शहा म्हणाले, अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. 1993 मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. 2008 मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९ मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला.

04:52 PM

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार हा इतिहासातील काळा अध्याय- फारुख अब्दुल्ला

अविश्वास प्रस्तावाबद्दल बोलताना, जम्मू काश्मिरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी लोकसभेत काश्मिरी पंडितांचा उल्लेख केला. "केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्यांचे सरकार आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये बालविवाह थांबले आहेत. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. महाराजा हरि सिंह यांनी 1928 मध्ये एक कायदा केला होता, ज्या अंतर्गत बालविवाहावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. दुसरे म्हणजे, काश्मिरी पंडितांवरील अत्याचार हा इतिहासातील काळा अध्याय आहे. 1947 मध्ये जेव्हा आदिवासी हल्लेखोरांनी हल्ला केला, तेव्हा महाराजा हरि सिंह यांचे सैन्य कमी होते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन म्हटले की आम्ही एकत्र लढू. तेव्हा शस्त्रे नव्हती पण जोश होता. पतियाळा रेजिमेंटने सर्वप्रथम येऊन आम्हाला मदत केली."

04:52 PM

काश्मीर, मणिपूरला प्रेमाची गरज; प्रेमाने सगळे प्रश्न सुटतील- फारूख अब्दुल्ला

"आम्ही नेहमीच काश्मिरी पंडितांच्या बाजूने आहोत. आम्ही भारताचा भाग नाही असे म्हणू नका. काश्मीरच्या जनतेला प्रेमाची गरज आहे. तिथे अजून शांतता नाही. म्हणूनच तुम्ही G20 शिष्टमंडळाला गुलमर्गला नेले नाही. मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत. मित्रासोबत प्रेमाने राहिल्यास दोघांचीही प्रगती होईल. केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर शत्रुंशी दोन हात करा. पण आमच्यावर संशय घेणे थांबवा, कारण आम्ही या देशासोबत उभे आहोत, उभे आहोत आणि यापुढेही उभे राहू. तसेच मणिपूरमध्येही प्रेमाने काम करावे लागेल. प्रेमानेच प्रश्न सुटतील," असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.

04:47 PM

काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये परत आणण्याचा आम्हीही प्रयत्न केला- फारूख अब्दुल्ला

"भारतात राहण्याचा आम्हाला अभिमान आहे, पण या देशाचेही त्याच्या नागरिंकाप्रति काही कर्तव्य आहे. फक्त हिंदूंसाठी नाही तर मुस्लिम, शीख, ख्रिश्चनांसाठी देशातच्या सरकारने कर्तव्ये पार पाडायला हवीत. पंतप्रधान मोदी हे एका विशिष्ट गटाचे किंवा रंगाचे नव्हे, तर देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही काश्मिरी पंडितांना परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे ही योजना बंद पडली. आता तुमचे सरकार आल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये स्थायिक झाले, हे  तुम्हीच सांगा. एकही नाही काश्मिरी पंडित परत आलेला नाही," असे अब्दुल्ला म्हणाले.

04:41 PM

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार हा इतिहासातील काळा अध्याय- फारुख अब्दुल्ला

अविश्वास प्रस्तावाबद्दल बोलताना, जम्मू काश्मिरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी लोकसभेत काश्मिरी पंडितांचा उल्लेख केला. "केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्यांचे सरकार आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये बालविवाह थांबले आहेत. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. महाराजा हरि सिंह यांनी 1928 मध्ये एक कायदा केला होता, ज्या अंतर्गत बालविवाहावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. दुसरे म्हणजे, काश्मिरी पंडितांवरील अत्याचार हा इतिहासातील काळा अध्याय आहे. 1947 मध्ये जेव्हा आदिवासी हल्लेखोरांनी हल्ला केला, तेव्हा महाराजा हरि सिंह यांचे सैन्य कमी होते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन म्हटले की आम्ही एकत्र लढू. तेव्हा शस्त्रे नव्हती पण जोश होता. पतियाळा रेजिमेंटने सर्वप्रथम येऊन आम्हाला मदत केली."

03:19 PM

७२ हजार कोटी कर्ज अदानींना कुणी दिले? - स्मृती इराणी

हे कधीपासून अदानी, अदानी करतायेत. मी पण सांगते, फोटो माझ्याकडेही आहेत. १९९३ मध्ये काँग्रेसनं अदानींना मुद्रा पोर्टसाठी जागा दिली. यूपीए सरकारच्या काळात ७२ हजार कोटींचे कर्ज अदानींना दिले. काँग्रेसशासित अनेक राज्यांमध्ये अदानींना कामे का दिली? – स्मृती इराणी, भाजपा

03:07 PM

ही कसली वर्तवणूक? दुर्दैवी आहे - रवी शंकर प्रसाद

राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिला, त्यांना काय झालंय?, सभागृहात इतक्या महिला बसल्या होत्या. ही कसली वर्तवणूक? अत्यंत दुर्दैवी आहे - रवी शंकर प्रसाद 

02:29 PM

"मोदी फकीर है, इस देश की तकदीर है"

मोदी फकीर है, इस देश की तकदीर है....तुम्ही मोदींचे काय बिघडवणार? लोकांनी शिव्या दिल्या. तरीही ऐकत राहिले. देशातील गरीब लोकांसाठी, मजुरांसाठी मोदी लढत राहिले. जोपर्यंत मोदी आहेत गरीबांचे अश्रू पुसले जातील. विरोधकांचं दु:ख मला समजू शकते. मोदींनी यांचा भ्रष्टाचार बंद केला. वडील चहा विकायचे. आई धुणीभांडी करायची त्याचा मुलगा देशातील गरीबांना साथ देतोय. अश्रू पुसतोय हे विरोधकांना पाहवत नाही. चीन, पाकिस्तान आणि परदेशी गँगने पंतप्रधान बनवण्याचं आश्वासन दिलंय. विरोधकांच्या रक्तात राजकारण आहे – राम कृपाल यादव, भाजपा खासदार

02:19 PM

राहुल गांधींवर कारवाई होणार?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपा महिला खासदार आक्रमक झाल्या आहेत. संसदेतील २२ महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

02:04 PM

राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिल्याचा आरोप

"माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्याअगोदर बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्यता दाखवली. संसदेत बसलेल्या महिला सदस्याला फ्लाइंग किस दिली, असे अशोभनीय वर्तन यापूर्वी देशाच्या संसदेत कधीही पाहिले नव्हते – स्मृती इराणी

01:13 PM

काँग्रेसचा इतिहास रक्ताने माखलेला - स्मृती इराणी

काँग्रेसचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. मणिपूरमध्ये चर्चा व्हावी, अशी या लोकांची इच्छा आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत, असे आमच्या नेत्यांनी सांगितले. हे लोक पळून गेले, आम्ही नाही. पळून जाण्यामागचे कारण काय, गृहमंत्री जेव्हा बोलू लागतील. तेव्हा हे लोक गप्प राहतील. हे लोक अनेक गोष्टींवर मौन बाळगून होते. आजही गप्प. आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात की यांच्या भ्रष्टाचारामुळे GDP वर ९% परिणाम होईल, पण ते गप्प होते. आजही गप्प. उघड्यावर शौचास बसल्यामुळे महिलांवर बलात्कार होत असल्याचे यूपीए सरकारला २००५ मध्ये समोर आले. तरीही ते गप्पच होते.

01:07 PM

राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले

अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत भाषण केल्यानंतर राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले. राहुल गांधी त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी राजस्थानला जाणार आहेत.

01:04 PM

भारतमातेची हत्या झालीय, त्यावर काँग्रेस टाळ्या वाजवतं - स्मृती इराणी

पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात भारत मातेची हत्या करण्याचं विधान करण्यात आले. जे भारत मातेच्या हत्येवर टाळ्या वाजवतात त्यांच्या मनात देशासाठी काय आहे याचे संकेत मिळाले. मणिपूर खंडीत नाही. देशाचा हिस्सा आहे. भारताचा अर्थ उत्तर भारत आहे असं तामिळनाडूत तुमच्या सहकारी पक्षाने सांगितले. राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर डीएमकेसोबत युती तोडून दाखवावी. जे काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची भाषा करतात त्यांना तुम्ही रोखत नाही – स्मृती इराणी

12:52 PM

गांधी कुटुंब म्हणजे भारत नाही - स्मृती इराणी

राहुल गांधी म्हणजे भारत नाही. मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग. भारत मातेची हत्या केलीय या राहुल गांधींच्या विधानावर बाके वाजवली आहे. आईची हत्या झालीय त्यावर टाळ्या वाजवल्या. मणिपूर खंडीत झाले नाही. - स्मृती इराणी 

12:46 PM

मोदी केवळ या दोन व्यक्तींचे ऐकतात - राहुल गांधी

वेळ आली तर भारतीय लष्कर मणिपूरमध्ये शांतता आणू शकते. पंतप्रधान मणिपूरचं काही ऐकत नाही. मणिपूरमध्ये तुम्ही माझ्या आईची हत्या केलीय. नरेंद्र मोदी केवळ २ व्यक्तींचे ऐकतात,अमित शाह आणि गौतम अदानी - राहुल गांधी

12:42 PM

तुम्ही भारत मातेची हत्या केलीय - राहुल गांधी

"काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आमचे पंतप्रधान गेले नाहीत, आजही गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा भारत नाही. मी 'मणिपूर' हा शब्द वापरला, पण सत्य हे आहे की मणिपूर आता राहिले नाही. तुम्ही मणिपूरचे दोन तुकडे केलेत. तुम्ही मणिपूरचे विभाजन करून तोडले आहे. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या तुम्ही केली, तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही भारत मातेची हत्या केलीय - राहुल गांधी

12:39 PM

भारताची हत्या केलीय, राहुल गांधींच्या विधानानं गोंधळ

मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारताची हत्या केलीय या राहुल गांधींच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गोंधळ, सत्ताधारी पक्षाचे खासदार आक्रमक, राहुल गांधींनी माफी मागावी, किरेन रिजिजू यांनी केली मागणी 

12:34 PM

मोदींसाठी मणिपूर म्हणजे भारत नव्हे - राहुल गांधी

मी मणिपूरला गेलो, पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. मणिपूर आपल्या देशात नाही असं त्यांना वाटते. रिलिफ कॅम्पमध्ये महिलांशी संवाद साधला. मोदींसाठी मणिपूर भारतात नाही. जनतेचे ऐकायचे असेल तर अहंकार सोडावा लागेल. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. महिलेच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाला गोळ्या घातल्या, रात्रभर ती मृतदेहासोबत राहिली. मी खोटे बोलत नाही तर तुम्ही खोटे बोलताय - राहुल गांधी

12:25 PM

घाबरू नका, मी अदानींवर बोलणार नाही - राहुल गांधी

मी आज मनाने बोलणार आहे, तुम्ही घाबरू नका, अदानींवर बोलणार नाही. देश समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. लाखोंच्या शक्तीमुळे मी यात्रा पूर्ण करू शकलो - राहुल गांधी

11:31 AM

सरकार राहुल गांधींना इतकं का घाबरतं? - काँग्रेस

भाजपा देशाचा, समाजाचा विचार करत नाही, मणिपूरवर बोलत नाही. केवळ राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला शिव्या देणे हेच एक काम त्यांच्याकडे आहे. हे सरकार राहुल गांधींना इतके का घाबरते? मला कळत नाही – अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते

10:33 AM

राहुल गांधी आज अविश्वास प्रस्तावावर बोलणार

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी १२ वाजता अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. मोदी आडनावावरून झालेल्या वादानंतर राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा झाली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. परंतु सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. 

09:39 AM

I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांची बैठक

I.N.D.I.A. आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज सकाळी १० वाजता संसदेतील राज्यसभेतील एलओपी चेंबरमध्ये बैठक, सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी होणार चर्चा 

06:12 PM

सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

आता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल. 

06:01 PM

चिनी घुसखोरीची आजपर्यंत चर्चा का झाली नाही?; मनीष तिवारी यांचा सवाल

काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, म्यानमारच्या जंटा आणि चीनचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये जी काही अस्थिरता निर्माण होते, त्याचा देशावरच परिणाम होत नाही, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही त्याचा परिणाम होतो. या संदर्भात मी चीनचाही उल्लेख करतो. एप्रिल २०२०मध्ये, नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसखोरी झाली होती. घुसखोरी एका ठिकाणी झाली नाही, तर ८ ठिकाणी घुसखोरी झाली. मनीष तिवारी म्हणाले की, आज त्या घुसखोरीला ३७ महिने पूर्ण झाले आहेत. या घुसखोरीमागे चीनचा राजकीय हेतू काय आहे, हे सरकार तपासू शकले आहे का? आजपर्यंत या सभागृहात चीनवर चर्चा झाली नाही, असं मनीष तिवारी यांनी सांगितले.

05:40 PM

मनीष तिवारी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी संसदेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मणिपूरवर लक्ष केंद्रित करून हा अविश्वास प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला आहे. सीमावर्ती राज्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली. पण जेव्हा ईशान्येतील कोणत्याही राज्यात हिंसाचार होतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या राज्यावरच नाही तर संपूर्ण ईशान्येवर होतो. ४ वर्षांपूर्वी जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले होते, परंतु आजपर्यंत त्या राज्यात निवडणुका झाल्या नाहीत. राज्यघटनेच्या रचनेत तुम्ही बदल करताना त्याचा कुठे परिणाम होतो, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असं मनीष तिवारी यांनी सांगितले. 

04:59 PM

काँग्रेसच्या वाईट धोरणांमुळे आज मणिपूरची अशी अवस्था झाली आहे- किरेन रिजिजू

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, दिल्लीत बसून तुम्ही लोक आज मणिपूर जळाले आहे, असा विचार करू नका. गेल्या काही वर्षांपासून तुमच्या निष्काळजीपणामुळे हे घडले आहे. काँग्रेसच्या वाईट धोरणांमुळे मणिपूरची आज अशी अवस्था झाली आहे. मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांची संख्या सर्वाधिक होती. पण २०१४नंतर एकही अतिरेकी संघटना टिकू शकलेली नाही. रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सर्वांचा विश्वास जिंकला आहे. रिजिजू म्हणाले की, पूर्वी ईशान्येतील मुलांवर अत्याचार व्हायचे, पण आता त्यातही आता बदल झाला आहे, असं किरेन रिजिजू म्हणाले.

04:46 PM

अरुणाचलमध्ये चीनने प्रवेश केलेला नाही- किरेन रिजिजू

विरोधकांना आव्हान देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले की, आज विरोधी पक्षाचे नेते आरोप करतात की चीन भारतात घुसला आहे, चिनी लोक स्थायिक झाले आहेत. पण परिस्थिती तशी नाही. इथे बसून तुम्ही लोकांची दिशाभूल करता. मी सर्व नेत्यांना सांगतो की, या पावसाळी अधिवेशनानंतर तुम्ही माझ्यासोबत अरुणाचलला चला, मी तुम्हाला अरुणाचल प्रदेश दाखवतो. मग तुम्हाला दिसेल की चीन कुठेही घुसखोरी केलेली नाही, असं किरेन रिजिजू म्हणाले.

04:38 PM

..तो प्रसंग ममता बॅनर्जींना आठवत नसेल - किरेन रिजिजू, मंत्री

भारताची प्रतिमा जगभराने वेगाने बदलत आहे. जगातील अनेक नेत्यांना नरेंद्र मोदींवर विश्वास वाटतो. जी-२० संमेलनाचे अध्यक्षपद भारताकडे आहे. जगात जितके भारतीय आहेत त्यांना नरेंद्र मोदींचे नेतृत्व २०४७ पर्यंत भारताला बलाढ्य नेतृत्व बनवण्यासाठी सक्षम आहे. काँग्रेस पार्टी आणि विरोधकांना अविश्वास प्रस्तावाचा पश्चाताप होईल. २००४ पासून मी संसदेत आहेत. भाजपा १३८ तर काँग्रेसकडे १४५ जागा होत्या. लेफ्टफ्रंटच्या पाठिंब्याने काँग्रेसनं सरकार बनवले. १४५ जागा असूनही काँग्रेसला ४५० जागा असल्याचा भास व्हायचा. त्यावेळी टीमसीच्या ममता बॅनर्जी एकट्या निवडून आल्या होत्या. त्यांनाही बोलायला दिलं जात नव्हते. ममता बॅनर्जी वारंवार बोलायचा प्रयत्न करत होते. तेव्हा कम्युनिस्ट पक्ष शारिरीक हिंसाचारावर उतरला होता. लोकसभेत महिला खासदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही त्याला विरोध केला. आज कदाचित ममता बॅनर्जींनी आठवत नसेल. भारताची अर्थव्यवस्था जगात जलदगतीने पुढे येतेय. देश प्रगती करतोय म्हणून तरी पाठिंबा द्यायला हवा. इंडिया नाव ठेऊन देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर लोकं विश्वास ठेवणार नाहीत -  किरेन रिजिजू, मंत्री


03:59 PM

...तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही का?, नारायण राणेंचा अरविंद सावंताना प्रश्न

अविश्वास प्रस्तावावर अनेकांची भाषणे ऐकली, आत्ताच अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलोय असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर सावंतांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचे काम केले. हिंदुत्वाची भाषा केली. उद्धव ठाकरे गटाचे हिंदुत्वाबाबत बोलले. हिंदुत्वाबद्दल इतकं प्रेम होतं मग २०१९ मध्ये सत्तेसाठी शरद पवारांसोबत गेले तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही का? हिंदुत्व आणि खरी शिवसेनेबाबत बोलतात पण अरविंद सावंत शिवसेनेत कधी आले? मी १९६६ चा शिवसैनिक आहे. हे आम्हाला शिवसेनेबाबत बोलणार का? मी पक्ष सोडला, २२० लोकांनी आंदोलन केले होते. आता काहीच शिल्लक नाही. आता आवाज येतोय तो मांजराचा आहे, वाघाचा नाही. पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची औकात नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवाल तर तुमची औकात दाखवू – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

03:42 PM

लोकांचा गमावलेला विश्वास काँग्रेसला पुन्हा मिळवता येणार नाही - सुनीता दुग्गल, खासदार भाजपा

भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये देशप्रेम भरले आहे. काँग्रेसचा गेलेला विश्वास परत येणार नाही. ४४० वरून ४० वर काँग्रेस आली. आमचा पक्ष २ वरून ३०३ पर्यंत आला. लोकांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. आता सुरुवात झालीय. पंतप्रधानांनी २०१८ मध्ये भविष्यवाणी केली होती ती आज खरी ठरली. २०२३ ला विरोधकांनी अविश्वास आणला. आता पंतप्रधान बोललेत २०२४ मध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येईल. पुन्हा ते खरे ठरेल   - सुनीता दुग्गल, खासदार, भाजपा

03:30 PM

सरकारला लाज वाटत नाही का, अरविंद सावंत यांचा सवाल

हे सरकार संवेदनहिन आहे. आज ९ वर्ष झाली, बीएसएनल बुडतोय, रोजगार जातोय, महिलांवर अत्याचार होतोय. सोशल मीडियावर द्वेषाचे राजकारण पसरवलं जातंय, आम्ही मणिपूरला गेलोय, तिथला हिंसाचार बघितलाय, त्यावरही राजकारण होतंय, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ३० सेकंदांसाठी पंतप्रधान बोलतंय, जे पळपुटे आहेत त्यांनी हिंदुत्वावर भाष्य करू नये. मंदिरातील घंटा वाजवणारा हिंदू नको, दहशतवाद्यांना मारणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणायचे. मणिपूर असो वा हिंदुत्व, ज्यांचे नाव घेऊन पंतप्रधानांनी नॅचरल करप्ट पार्टी असं संबोधले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला त्यातील सर्व महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी झाले आणि मंत्रीही झाले. पळपुटे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलणार? मणिपूरबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर मोदी बोलले, सुप्रीम कोर्टाने एसआयटी निर्माण केली. सरकार कुठे आहे? मणिपूरचा तपास कोण करणार हे सुप्रीम कोर्ट ठरवणार, सरकारला लाज वाटत नाही का? – अरविंद सावंत, ठाकरे गट, खासदार

02:57 PM

७० वर्षात औरंगाबादचं नाव बदलता आलं नाही - श्रीकांत शिंदे

गेल्या १ वर्षात महाराष्ट्रात अनेक विकासकामे करण्यात आली. मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक रोड, महिलांना ५० टक्के दरात एसटी प्रवास, आपला दवाखाना अशा विविध योजना आणल्या. औरंगजेबने संभाजी महाराज यांची हत्या केली. परंतु ७० वर्षात काँग्रेसला औरंगाबाद नामांतरण करता आले नाही. १ वर्षापूर्वी औरंगबादचं नामांतरण करून छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव करण्याचं काम आमच्या सरकारने केलं – श्रीकांत शिंदे

02:53 PM

लोकांसोबत गद्दारी करण्याचं काम काँग्रेससोबत जाऊन केले- श्रीकांत शिंदे

काही लोक गद्दारांसोबत अमित शाह बसलेत असं बोलतात, पण २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही कोणाचे फोटो मागून निवडून आला? सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार दावणीला बांधले. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब बोलायचे. निवडणूक एकासोबत लढली आणि खुर्चीसाठी विचार बाजूला ठेवत अनैतिक सरकार बनवले. काँग्रेससोबत शिवसेनेची युती होईल असं कुणाला वाटले नाही. लोकांसोबत गद्दारी करण्याचे काम काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी केले. १३ कोटी जनतेशी गद्दारी केली. ज्यांनी कारसेवकांवर गोळी चालवण्याचे काम केले त्यांच्यासोबत गेले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले. शिवसेना म्हणून आम्ही सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाचा विरोध करतो – श्रीकांत शिंदे

02:33 PM

मणिपूरमध्ये जे चाललंय त्याला समर्थन कसं देऊ शकता? - सुप्रिया सुळे

हे सरकार देशद्रोही आहे का? हा प्रश्न मी विचारत आहे. कुणाला मुलगी, सून, कुणाला बहीण आहे. मणिपूरमध्ये जे चाललंय त्याला सरकार तुम्ही कसं समर्थन देताय? एकजुटीने काम करूया. २०२४ हे या सरकारचे एकमेव लक्ष्य आहे. हे सरकार गरीब जनतेचे नुकसान करत आहे. माझी मागणी आहे की मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा..दंगल, खून आणि बलात्काराच्या १० हजार केसेस? आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? हीच या सरकारची समस्या आहे असा आरोप सुप्रिया सुळेंनी लगावला. 

02:21 PM

भाजपने ९ वर्षात ९ सरकारे पाडली; सुप्रिया सुळेंनी सुनावले

ही लोकशाही आहे का? आपण एकमेकांना सोबत घेऊन चालले पाहिजे. मंत्री नेहमी सांगतात की, विरोधकांना सभागृह चालवायचे नाही. येथे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी एकत्र चालले पाहिजे. भाजपने राज्य सरकारे उलथवून टाकली. महागाईचा परिणाम देश भोगत आहे. अनेक घोटाळे समोर येत आहेत. भाजपने ९ वर्षात ९ सरकारे पाडली आहेत. हीच का तुमची पार्टी विथ द डिफरन्स? अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

02:12 PM

निशिकांत दुबे मणिपूरसंदर्भात अवाक्षरही बोलले नाहीत; टीएमसीचा पलटवार

मणिपूर जळत असताना पंतप्रधान परदेश दौऱ्यावर होते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या भाषणात मणिपूरबाबत काहीही वाच्छता केली नाही. देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र सरकार काहीच करत नाही. नूंहमध्ये दंगल होत आहे, मुस्लिम लोकांची घरे पाडली जात असल्याच्या बातम्या येत आहेत. पंतप्रधान मोदींचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही, अशी टीका टीएमसी नेते सौगत राय यांनी केली.

02:07 PM

इंडिया आघाडी मणिपूरमध्ये गेल्यामुळे खरे काय ते समजले

मणिपूरमधील अल्पसंख्याकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. तर १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ६५ हजार लोकांनी राज्यातून पलायन केले आहे. मणिपूरच्या रस्त्यावर दोन महिलांना विवस्त्र, सामूहिक बलात्कार आणि नग्नावस्थेत नेण्यात आले. मुख्यमंत्री हतबल आहेत. पंतप्रधान संसदेत येत नाहीत आणि ते राज्यातही गेलेले नाहीत. तर, I.N.D.I.A. पक्ष तेथे गेले आणि काय झाले ते समजले, अशी टीका डीएमके खासदार टीआर बालू यांनी केली.

 

01:48 PM

जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा....

गौरव गोगोई यांच्या भाषणाचा संदर्भ देत निशिकांत दुबे म्हणाले की, ८३ च्या निवडणुकीत आसाममध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले. किती लोक मारले गेले. तुम्ही मिझोराममध्ये ७ टक्के मतांच्या जोरावर सरकार चालवू दिले. संपूर्ण देशाला कळायला हवे. जनतेला शौचालये आणि पिण्याचे पाणी देणाऱ्या माणसाच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात येत आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना सगळे गप्प होते. ज्याप्रमाणे धृतराष्ट्र किंवा युधिष्ठिर दोघेही वाचले नाहीत, त्याचप्रमाणे कोणीही जिवंत राहणार नाही.

01:38 PM

मीदेखील मणिपूरच्या इतिहासाचा बळी, भाजपा खासदारांनी काँग्रेसला सुनावलं

गौरव गोगोई म्हणाले की, तुम्हाला मणिपूरबद्दल माहिती नसेल. तुमच्यापैकी बरेच जण मणिपूरला गेले नसतील. पण मी मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. मणिपूरमध्ये माझ्या मामानं पाय गमावलाय. ते सीआरपीएफचे डीआयजी होते. एन के तिवारी मणिपूरला आयजी म्हणून गेले तेव्हा तुमच्या (काँग्रेस) सरकारने त्यांना अटक केली. तुम्ही राष्ट्रवादावर बोलत आहात. ८३ च्या निवडणुकीत आसाममध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले. किती लोक मारले गेले. तुम्ही ऑल इंडिया आसाम स्टुडंट युनियनशी करार केला होता तेव्हा त्या कराराचा एक भाग होता की हे सरकार हटवले जाईल. तुमचे सरकार संपेल. ती तडजो पक्षासाठी नव्हती का? मी गृहमंत्र्यांना सांगेन की त्यांनी उत्तर देताना या कराराचे संपूर्ण स्वरूप सांगावे असं भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले. 

01:27 PM

राहुल गांधींना उशिरा जाग आली असेल – निशिकांत दुबे

भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे आम्ही ऐकत होतो, मात्र ते आले नाहीत. कदाचित उशिरा जाग आली असेल. गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली ही चांगली गोष्ट आहे. मी अविश्वास ठरावाच्या विरोधात उभा राहिलो आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘मोदी’ आडनाव टिप्पणी प्रकरणात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित दुबे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. स्थगिती आदेश दिला आहे. मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही असं ते म्हणतात पण तुम्ही कधीच सावकार होऊ शकत नाही असा टोला दुबे यांनी राहुल गांधींना लगावला.

01:21 PM

"मणिपूरमधील सरकार अपयशी ठरलंय हे मान्य करा"

पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचे डबल-इंजिन मणिपूरमधील सरकार अपयशी ठरलंय. मणिपूरमध्ये १५० लोकांचा मृत्यू झाला, सुमारे ५००० घरे जाळली गेली, ६०००० लोक कॅम्पमध्ये आहेत. ६५०० एफआयआर नोंदवले गेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी चर्चेचे, शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत समाजात तणाव निर्माण करणारी पावले उचलली आहेत असा आरोप काँग्रेस खासदार गौरव गोगाईंनी केला.

01:17 PM

काँग्रेस खासदाराने पंतप्रधानांना विचारले ३ प्रश्न

मणिपूरवर संसदेत न बोलण्याचं मौन व्रत पंतप्रधानांनी घेतलंय. त्यामुळे त्यांचे मौनव्रत तोडण्यासाठी आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणवा लागला. आमचे ३ प्रश्न आहेत.

  1. मोदींनी आजपर्यंत मणिपूरला भेट का दिली नाही?
  2. मणिपूरला बोलायला ८० दिवस का लागले, जेव्हा बोलले तेव्हा ३० सेकंद का बोलले?
  3. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी हटवले का नाही?

 

हे प्रश्न काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत उपस्थित केले.

Web Title: No confidence motion Debate in lok sabha live updates parliament monsoon session trust vote pm Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Gaurav Gogoi Bjp Congress latest updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.