लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाषण संपल्यानंतर ते सभाग्रूहातून निघून गेले. यानंतर, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आपल्य भाषणात राहुल गांधींवर जरदोरा हल्ला चढवला. स्मृती म्हणाल्या, आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचे इशारे केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईरानी म्हणाल्या, येथे माझ्या आधी ज्यांना बोलायची संधी देण्यात आली त्यांनी आज असभ्यपणाचा परिचय दिला आहे. त्यांनी आपले भाषण संपल्यानंतर, असभ्य वर्तन केले. त्यांनी ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते. एवढेच नाही, तर असे असभ्य आचरण या देशाच्या सदेत कधीही दिसले नाही. हे त्या खानदानाचे लक्षण आहे, हे आज देशाला समजले, असेही स्मृती म्हणाल्या.
महिला खासदारांनी केली अध्यक्षांकडे तक्रार -यासंदर्भात भाजप खासदार पूनम महाजन म्हणाल्या, राहुल गांधी यांनी आज सभागृहात केलेले कृत्य असंसदीय आहे. आम्ही याचा धिक्कार करत असून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत. यानंतर महिला खासदारांच्या एका गटाने राहुल गांधींच्या या कृत्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
राहुल गांधींवर पलटवार - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. यानंतर, राहुल गांधींच्या भाषणावर पलटवार करताना स्मृती म्हणाल्या, "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे."
"मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देशाचाच भाग आहे. पण तुमच्या मित्र पक्षाचे नेते तामिळनाडूत म्हणाले की, भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर द्रमुकच्या सहकाऱ्याचे खंडन करून दाखवा. काश्मीर भारतापासून वेगळे करण्याची चर्चा करण्याची भाषा करणाऱ्या काश्मीरमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध करून दाखवा," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले."