केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आघाडीने आणलेला अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेत फेटाळला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यामुळे पंतप्रधानांचं भाषण आटोपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान घेतले. त्यात हा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला गेला.
मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारची कोंडी करत विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज रोखून धरलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होता. दरम्यान, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या अविश्वास प्रस्तावावर गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू होती. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं. मात्र तत्पूर्वीच विरोधकांनी सभात्याग केलेला असल्याने हा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला गेला.
अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर भाजपा नेते प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पारित केला. जोपर्यंत अधीर रंजन चौधरी यांच्याबाबत विशेषाधिकार समिती आपला अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत अधीर रंजन चौधरी निलंबित राहतील.