- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसतर्फे अविश्वास ठराव देण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.ठरावावरील चर्चा सोमवारी घ्यावी, असा आग्रह काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी धरला. ते म्हणाले की, शुक्रवारी ३0 ते ३५ सदस्य सभागृहात नसतील. त्यामुळे सोमवार वा गुरुवार सोयीचे आहेत. तथापि ठराव महत्त्वाचा असल्याने सदस्यांनी उपस्थित राहावे, असे अनंतकुमार म्हणाले. 50 सदस्यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याने अध्यक्षांनी तो दाखल करून घेतला. तेलुगू देसमचा ठराव पहिला व काँग्रेसचा दुसरा; चर्चेची सुरुवात व समारोप तेलुगू देसम करेल.>सरकारला धोका आहे का? बहुमताची स्थिती काय ?लोकसभेच्या ५४५ संख्येपैकी सध्या सभागृहात ५३५ सदस्य आहेत. त्यात भाजपाचे २७३ सदस्य आहेत. शिवसेना १८, लोकजनशक्ती ६, अकाली दल ४ व अन्य ९ सदस्यांचा सरकारला पाठिंबा असल्याने संख्या ३१0 वर जाते. त्यामुळे मतदानात सरकारला कोणताही धोका दिसत नाही.>कोण म्हणतो की, विरोधकांकडे बळ नाही?लोकसभेत सरकारचे बहुमत आहे. विरोधकांकडे संख्याबळ नाही, त्यामुळे विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागणार नाही काय? असा सवाल सोनिया गांधी यांना केला असता, त्यांनी कोण म्हणतो की, विरोधकांकडे संख्याबळ नाही? असा प्रतिसवाल केला.>पंतप्रधान मोदींना देशाचे समर्थन आहे. सभागृहात ठरावाचा सामना करायला सरकार तयार आहे. ठरावाचे आम्ही स्वागत करतो.- अनंतकुमार,संसदीय कार्यमंत्री.
No Confidence Motion: मोदी सरकारविरोधात पहिला अविश्वास ठराव, विरोधकांची एकजूटही अभेद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 6:21 AM