No Confidence Motion : फोडा आणि राज्य करा हेच मोदी सरकारचे काम - मल्लिकार्जुन खर्गे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 06:26 PM2018-07-20T18:26:33+5:302018-07-20T18:32:54+5:30
तेलगू देसमने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देताना काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली.
नवी दिल्ली- तेलगू देसमने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देताना काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. खर्गे यांनी हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालत आहे असा थेट आरोप करत खर्गे यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार सभागृहात काही लोकांना बाहेर जाण्यास सांगते, काही लोकांना अनुपस्थित राहाण्यास सांगते. फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने हे सरकार कामकाज करते असा थेट आरोप खर्गे यांनी पंतप्रधान आणि सरकारवर केला.
रा. स्व. संघाचे विचार आणि राजनाथ सिंह यांनी ज्या बसवेश्वरांचा उल्लेख केला त्यांचे विचार कधीही एका पातळीवर येऊ शकत नाहीत अशा शब्दांमध्ये खर्गे यांनी सरकारवर टीका केली. लोकपालच्या नेमणुकीसाठी सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याला बोलवण्यात यावे यासाठी एक साधी दुरुस्ती कायद्यामध्ये या सरकारला करता आली नाही. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याला यामध्ये आमंत्रित करता यावे यासाठी लोकसभेच्या सभापती आणि सत्ताधारी पक्ष प्रयत्न करु शकतो. मात्र या सरकारने ते केले नाही.
टीडीपीचा प्रस्ताव स्वीकारुन तुम्ही आम्हाला सर्वांना पुरेसा वेळ देऊन बोलायला दिलंत यासाठी मी सभापतींचा आभारी आहे असे शब्द खर्गे यांनी उच्चारले. यावर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी तीन-चार वर्षांत पहिल्यांदा तुम्ही धन्यवाद दिले असे उत्तर दिले. यावर सभागृहात एकच हशा पिकला.