No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:20 PM2018-07-20T23:20:13+5:302018-07-21T07:03:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे.

No Confidence Motion: The Modi Government has won the trust | No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

googlenewsNext

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं फक्त 126 मतं पडली आहेत. तर ठरावाच्या विरोधात 325 खासदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे.

मतदानादरम्यान जवळपास 92 खासदार अनुपस्थित होते.  अविश्वास प्रस्तावावर एकूण 451 सदस्यांनी मतदान केलं आहे. प्रस्तावावरील मतदानानंतर लोकसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे AIADMKच्या काही खासदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोदी सरकारला नवा मित्र सापडल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मोदींनी यावेळी काँग्रेसला अहंकारी म्हटलं आहे. काँग्रेसची माणसं जी भाषा बोलतात, ती अतिआत्मविश्वास आणि अज्ञानातून आलेली आहे. हा अविश्वास प्रस्ताव नव्हे, तर काँग्रेसच्या कथित मित्र पक्षांची फ्लोअर टेस्ट आहे. मी पुन्हा पंतप्रधान बनेन याचं ट्रायल सुरू आहे. तसेच आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर मोदींनी भाष्य केलं आहे. जोरजबरदस्तीनं आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं. त्यावेळी मी म्हणालो होतो, तेलुगू आमची आई आहे. तेलुगूंच्या एकीची ताटातूट व्हायला नको होती. काँग्रेसमुळेच तेलंगणाचा वाद उत्पन्न झाला. काँग्रेसनं त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं विभाजन केलं आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतोय. काँग्रेसला विभाजन करून आंध्र प्रदेशला जिंकायचं होतं. परंतु काँग्रेसला ना आंध्र प्रदेश मिळालं ना तेलंगणा. आंध्र प्रदेशचं विभाजनं काँग्रेसनं बळाच्या जोरावर केलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून लोकसभेचे कामकाज सलग 12 तास चालले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.


शिवसेना व बिजू जनता दलाच्या खासदारांनी मतदानात भाग न घेता वॉकआऊट केलं. भाजपाचे खासदार के. सी. पटेल आणि भोला सिंग हे आजारी असतानाही फक्त मतदानासाठी लोकसभेत उपस्थित राहिले, तर खासदार पप्पू यादव यांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. मोदींनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेल्या मित्रपक्षांचे आभारही मानले आहेत. तसेच 125 कोटी जनतेचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. भारतात परिवर्तन घडवण्याबरोबरच तरुणांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत.
   

Web Title: No Confidence Motion: The Modi Government has won the trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.