No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:40 AM2018-07-21T06:40:50+5:302018-07-21T06:42:17+5:30

काही लोकांमध्ये किती नकारात्मक पद्धतीने विचार व राजकारण रूजले आहे, हे अविश्वासाच्या ठरावामुळे उघड झाले आहे.

No Confidence motion: Opposition hurts power for power - Narendra Modi | No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी

No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली : काही लोकांमध्ये किती नकारात्मक पद्धतीने विचार व राजकारण रूजले आहे, हे अविश्वासाच्या ठरावामुळे उघड झाले आहे. हा ठराव म्हणजे सरकारची नव्हे, तर काँग्रेस व मित्रपक्षांच्या ताकदीची परीक्षा आहे, आपले २0१९ मध्ये सरकार येईल आणि आपणच पंतप्रधान बनू, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी या व्यक्तीला दूर करण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. अर्थात पंतप्रधानपदी कोणाला बसवायचे, हे तुम्ही वा आम्ही नव्हे, तर देशातील सव्वाशे कोटी जनता ठरवेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी यांनी सर्व विरोधकांवर लोकसभेत अतिशय आक्रमक पद्धतीने टीकास्त्र सोडले. त्यांच्या भाषणानंतर हा ठराव आधी आवाजी मतदानाने व नंतर प्रत्यक्ष मतमोजणीद्वारे फेटाळला गेला.
अविश्वासाच्या ठरावावर दिवसभर सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी सदस्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदी सरकारला सर्व आघाड्यांवर आलेले अपयश, नीरव मोदी, ललित मोदी यांना अप्रत्यक्षपणे केलेली मदत, ठराविक उद्योगपतींना मिळालेली प्रचंड कर्जे याच उद्योगपतींकडून सुरू असलेले मोदी यांचे मार्केटिंग यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. तसेच महिला व अल्पसंख्यांवर हल्ले होत असताना मोदी यांनी गप्प बसून राहणे, जुमल्यांचे राजकारण, गरीब, बेरोजगार, शेतकरी यांचे होत असलेले हाल यांचाही विरोधी सदस्यांनी भाषणात उल्लेख केला होता.
मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइक नव्हे तर जुमला स्ट्राइक करीत सुटले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केले. तरुण, बेरोजगार, शेतकरी, सर्वसामान्य असे सारेच जण मोदींच्या जुमला स्ट्राइकचे बळी आहेत, असा आरोप करून राहुल म्हणाले की, मोदींचा एक जुमला होता प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा. त्यातील एक पैसाही मिळाला नाही. दुसरा जुमला दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा. प्रत्यक्षात ४ लाखांनाच रोजगार मिळाला. आता मोदी जिथे जातात, तिथे तरुणांना पकोडे तळा, पकोडे विका असे ते सांगत आहेत.
भाषणात मोदी यांच्या टीकेचा रोख मात्र काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर होता. राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करता मोदी म्हणाले की, चर्चा सुरू होती, ठरावावर मतदानही झाले नव्हते, तेव्हाच पंतप्रधानांच्या जागेवर येऊन उठा उठा असे म्हणण्याची घाई काहींना झाली. या जागेवर कोणाला बसवायचे, हा निर्णफ सव्वाशे कोटी लोकच घेतात. गेल्या चार वर्षांत सरकारने राबविलेल्या योजनांचा आढावा घेताना ते म्हणाले की १३ कोटी तरुणांना सरकारने कर्ज दिले.त्यांना स्वयंरोजगार वा उद्योगाच्या संधी मिळाल्या आहेत. वीज गेली नव्हती, तिथे आज उजेड दिसतो आहे. ईशान्येकडील राज्यांकडे तर काँग्रेसने कधी लक्षच दिले नव्हते. पण आज वेगाने ईशान्येच्या सातही राज्यांचा विकास होत आहे. त्यामुळे तेथील लोक खूश आहेत आणि भाजपा व मित्रपक्षांना त्यांनी सत्ता दिली आहे. मेक इन इंडिया, आर्थिक व्यवहारांचे डिजिटायजेशन, काळ्या पैशाविरोधात सरकारचे प्रयत्न याचा फायदा देशातील सामान्य जनतेला झाला आहे. पण काँग्रेस व विरोधकांना हे दिसत नसेल, तर ती त्यांची चूक आहे.
त्यांच्या ठरावाच्या वेळी तेलगू देसमचे सदस्य सातत्याने गोंधळ घालत होते. त्यानिमित्ताने मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी झारखंड, उत्तराखंड व छत्तीसगड या राज्यांची निर्मिती केली. पण त्यामुळे कोणत्याही राज्याला विकासाचा प्रश्न भेडसावला नाही. काँग्रेसने आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची स्थापना केली. पण ते करताना आंध्र प्रदेशचे प्रश्न मात्र सोडविले नाहीत. ते सोडविण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. पण त्याचे श्रेय घेण्यासाठी तेलगू देसमचे नेते प्रयत्न करीत असून, आम्ही काहीच केले नाही, अशी ओरड करू लागले आहेत. मात्र आंध्रचे सर्व प्रश्न सोडवू, असे मी तेथील जनतेला सांगू इच्छितो.
काँग्रेसने चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा व गुजराल या पंतप्रधानांना कशी अपमानास्पद वागणूक दिली, हे इतर विरोधी पक्षांनी लक्षात ठेवावे, असेही मोदी म्हणाले. अविश्वासाचा ठराव तेलगू देसमने मांडला होता. त्या पक्षाचे जयदेव गल्ला यांनी मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. चर्चेला उत्तर देताना तेलगू देसमचे श्रीनिवास केनेसी म्हणाले की मोदी यांचे भाषण बॉलीवूड चित्रपटासारखे होते. त्यातून हाती काहीच लागले नाही.
>विरोधकांची संख्या १२६
ठरावावर आधी आवाजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी आवाजी मतदानाने अविश्वास ठराव फेटाळला गेला. त्यानंतर लगेचच विरोधी सदस्यांना प्रत्यक्ष मतदानाची मागणी केली. त्यासाठी लॉबीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना सभागृहात येण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतमोजणी घेण्यात आली. त्यावेळी ठरावाच्या विरोधात म्हणजे सरकारच्या बाजूने ३२५ मते पडली, तर ठरावाच्या बाजून १२६ मते पडली. एकूण ९२ सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. यात शिवसेना, बिजू जनता दल आदी पक्षांच्या सदस्यांचा सहभाग होता.
>झप्पी नव्हे झटका!
मोदी यांना राहुल यांनी मारलेले आलिंगन म्हणजे जादु की झप्पी नसून, मोठा झटका आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली.
>शिवसेना तटस्थ; बिजदचा सभात्याग
ठरावावरील मतदानात सहभागी न होता तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला, तर बिजू जनता दलाच्या सदस्यांनी सकाळीच लोकसभेतून सभात्याग केला.

Web Title: No Confidence motion: Opposition hurts power for power - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.