No Confidence Motion : लोकांचा या सरकारवर विश्वास नाही- तारिक अन्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 05:25 PM2018-07-20T17:25:15+5:302018-07-20T17:39:09+5:30
तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले.
नवी दिल्ली- तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले. नरेंद्र मोदी यांचे सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे मत त्यांनी मांडले. पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अनेकवेळा पराभव झाला आहे. यावरुन या सरकारवर लोकांचा विश्वास नाही हे स्पष्ट होते अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी सरकारवर टीका केली.
आपल्या भाषणामध्ये तारिक अन्वर म्हणाले, ''हे सरकार अच्छे दिनाच्या घोषणा करत सत्तेत आले. लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचे चित्र बदलेल असे वाटले होते. सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेची आज समिक्षा केल्यास सबका साथही नाही आणि सबका विकासही नाही असे दिसत आहे. या सरकारच्या काळामध्ये केवळ काही परिवारांचा विकास झाला असेल. संपूर्ण जगभरात आपली स्थिती वाईट झाली आहे. या देशात बुद्धिजिवी लोक घाबरुन जगत आहेत. महागाईमुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. पंतप्रधान देशाचे संरक्षण करणार असे म्हणाले होते, मात्र ज्या बँकांमध्ये गरिबांनी पैसा ठेवला होता, त्या बँकांचा पैसा घेऊन काही मोजके लोक परदेशात पळून गेले, यावेळेस पंतप्रधान आणि सरकार काहीच करु शकले नाहीत.''
हे सरकार दोन माणसे चालवत आहेत. राजनाथ सिंह यांचेही मत विचारात घेतले जात नाही. भाजपाने ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळात पाठवले आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन घेतले जात नाही. पंतप्रधान विरोधकांचं ऐकत नाहीत पण त्यांनी आपल्या पक्षातील लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेतला तरी त्यांच्या सरकारच्या स्थितीत फरक पडेल. त्यांची स्थिती सुधारेल अशा शब्दांमध्ये तारिक अन्वर यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. पंतप्रधान स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचेही म्हणणे ऐकत नाहीत, पुढील निवडणुकीत त्यांच्या दिडशे पेक्षा जास्त खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे असे मला भाजपातील लोकांकडून समजले आहे. पुढील काळात या खासदारांचा असंतोष बाहेर येईलच. असेही तारिक अन्वर यांनी सांगितले.