नवी दिल्लीः न मांझी न रहबर न हक मे हवाएहै कश्ती भी जर्जर ये कैसा सफ़र है...हा शेर ऐकवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेससह सर्वच विरोधकांना टोला लगावला आणि गळाभेट घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही चांगलीच फिरकी घेतली. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला त्यांनी उत्तर दिलं.
'ना संख्या, ना बहुमत... तरीही 'मोदी हटाओ'साठी ही सगळी झटापट सुरू आहे. आज सकाळी तर मी चकित झालो. चर्चा नुकतीच सुरू झाली होती, मतदानही झालं नव्हतं. जय-पराजयाचा निर्णय झाला नव्हता. पण ज्यांना इथे यायची इच्छा आहे ते आले आणि उठा, उठा, उठा म्हणाले. अहो, इथून कुणी उठवू शकत नाही आणि कुणी बसवू शकत नाही. सव्वाशे कोटी देशवासीयच इथे बसवू शकतात आणि इथून उठवू शकतात. जनतेवर विश्वास असला पाहिजे. इतकी काय घाई आहे इथे बसायची?', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
अशी झाली होती राहुल-मोदी गळाभेट!
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. पण भाषण संपवल्यानंतर लोकसभेत अद्भुत चित्र पाहायला मिळालं. 'काँग्रेस ही एक भावना आहे. ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणून राहुल यांनी भाषण संपवलं आणि ते वेलमधून थेट मोदींच्या खुर्चीकडे गेले. त्यांनी मोदींना आलिंगनासाठी उभं राहण्याची विनंती केली. पण, आचारसंहिता, शिष्टाचार लक्षात घेऊन ते उभे राहिले नाहीत. त्यामुळे राहुल यांनी स्वतःच पुढे होत त्यांना मिठी मारली.
काय म्हणाले राहुल...
सगळ्या विरोधकांना आणि तुमच्यातल्या काही लोकांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना हरवणार आहोत. माझ्या मनात पंतप्रधाबद्दल राग, द्वेष नाही. उलट, मोदी आणि भाजपाचा मी आभारीच आहे. त्यांनीच मला काँग्रेसचा अर्थ सांगितला. भारतीय असण्याचा अर्थ सांगितला. धर्म शिकवला. शिवाचा अर्थ सांगितला. हिंदू असण्याचा अर्थ सांगितला. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहे. तुम्ही मला कितीही शिव्या देऊ शकता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेस या भावनेनंच देश बनवला आहे. ही भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन.