नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपतींशी संबंध आहेत, हे सगळ्या देशानं पाहिलंय. मोदींच्या मार्केटिंगवर होणारा खर्च तेच करताहेत आणि मोदीही त्यांच्यासाठीच सगळं करताहेत. गरीबांबद्दल त्यांच्या मनात थोडीशीही जागा नाही. म्हणूनच, कधीही हेलिकॉप्टर न बनवलेल्या माणसाला त्यांनी राफेल करारामध्ये ४५ हजार कोटींचा फायदा करून दिलाय. ते चौकीदार नाहीत, तर भागीदार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही लक्ष्य केलं. त्यावरून सत्ताधारी खासदार संतापले आणि सभागृहात गदारोळ झाला.
राहुल गांधींच्या भाषणातील मुद्देः
>> मी देशाचा चौकीदार आहे, चौकीदारी करेन असं मोदी म्हणतात. पण त्यांच्या मित्राच्या मुलाची संपत्ती १६ हजार पटींनी वाढते, तेव्हा त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही >> यूपीएच्या काळात राफेल करारात प्रत्येक हेलिकॉप्टरची किंमत ५२० कोटी ठरली होती. पण काहीतरी जादू झाली आणि ती १६०० कोटी रुपये झाली.>> पंतप्रधान फ्रान्सला गेले होते. ते कुणासोबत गेले हे देशाला माहीत आहे. >> राफेल करारातील आकडे मी सांगू शकत नाही, तशी अटच करारात आहे, असं संरक्षणमंत्री म्हणाल्या होत्या.>> मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, पूर्ण देशाला किंमत सांगा, माझी काहीच हरकत नाही. >> पंतप्रधानांच्या दबावाखाली येऊन निर्मला सीतारामन खोटं बोलल्या. कुणाची मदत होतेय, ती का केली जातेय हे देशाला सांगा.>> देशातील २०-२५ उद्योगपतींचं अडीच लाख कोटींचं कर्ज सरकारने माफ केलं, पण शेतकऱ्यांचं केलं नाही.>> शेतकऱ्यांनी हात जोडून विनंती केली होती. पण, तुमच्यात शक्ती नाही, तुमच्यात दम नाही, सूट-बूट घालत नाही ना!>> पेट्रोलचे दर जगात खाली येताहेत, पण भारतात वाढतच जाताहेत. कारण, नरेंद्र मोदी आपल्या मित्रांच्या खिशात पैसे टाकू इच्छितात. >> मी बोलत असताना पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हते, हे देशाने पाहिलं आहे. ते चौकीदार नाहीत, भागीदार आहेत.
...
>> शेतकरी, तरुण, दलित, महिला आणि आदिवासी हे मोदी सरकारच्या 'जुमला स्ट्राइक'चे बळी>> पंतप्रधानांच्या शब्दाला काही अर्थ आहे की नाही, हा प्रश्न आज सगळा देश विचारतोय. >> प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये - जुमला स्ट्राइक नंबर १>> दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार - जुमला स्ट्राइक नंबर २ >> तरुणांनी पंतप्रधानांवर विश्वास ठेवला होता. पण फक्त चार लाख तरुणांना रोजगार मिळालेत. >> चीनमध्ये २४ तासांत ५० हजार तरुणांना रोजगार मिळतो, आपल्याकडे ४०० तरुणांना मिळतोय.>> जिकडे जातात तिकडे पकोडे बनवा, दुकानं उघडा असे सल्ले देतात. >> चीन दौऱ्यात डोकलामवर चर्चा न करून पंतप्रधानांनी जवानांचा विश्वासघात केला.