नवी दिल्ली- लोकसभेत तेलगू देसमने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाच्या शेवटी झालेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर गमतीदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे चालत आले याचा प्रश्न भाजपा खासदारांना पडेपर्यंत राहुल गांधी मोदींच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना मिठीच मारली.या मिठीवर पहिली प्रतिक्रिया लोकसभेत केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांनीच दिली. ये कोई पप्पीयाँ-झप्पीयाँ लेनेकी जगह नही है अशा शब्दांमध्ये हरसिम्रत कौर यांनी राहुल यांच्या झप्पीची फिरकी घेतली. सभागृहाबाहेरही यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल यांनी केलेल्या या कृतीवर ट्वीटरवर शहजाद पूनावाला यांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. '' अविश्वास दर्शक ठरावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्न मोदी यांना मिठी मारल्यानंतर राहुल गांधी यांनी डोळा मारला ही कृती संसदीय नियमांचे महत्त्व कमी करणारी आहे; ते विरोधीपक्षाचे नेते आहेत की मुन्नाभाई एमबीबीएसमधील एखादे पात्र आहेत?''अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी दक्षिणेतील अभिनेत्री प्रिया वॉरियरप्रमाणे डोळ्यांची हालचाल केली अशीही टिप्पणी ट्वीटरवर करण्यात आली आहे.
तर राहुल गांधी यांचे भाषण अत्यंत चांगले होत असे सांगत त्यांचे भाषण गेम चेंजर होते अशा शब्दांमध्ये खासदार शशी थरुर यांनी कौतुक केले आहे.