No Confidence Motion : राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 04:49 AM2018-07-21T04:49:44+5:302018-07-21T04:50:11+5:30
अविश्वासावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार व आक्रमक हल्ला चढवला.
नवी दिल्ली : अविश्वासावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार व आक्रमक हल्ला चढवला. त्यांचे भाषण इतके वादळी ठरले की, सभागृहाचे कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. महिलांवरील वाढते अत्याचार बलात्कार, जमावाकडून होणारा हिंसाचार याविषयी पंतप्रधान मोदी मूग गिळून गप्प बसल्याची टीका त्यांनी केली. आपण पंतप्रधान नसून देशाचे चौकीदार आहोत, असे सांगणारे मोदी प्रत्यक्षात काही उद्योगपतींना मदत करणारे भागीदार ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
भारत महिलांचे रक्षण करू शकत नाही, अशी आज देशाची प्रतिमा झाली आहे. ही बाब शरमेची आहे, पण महिलांवर अत्याचार होताना पंतप्रधानांच्या तोंडून एकही शब्द बाहेर येत नाही, अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने ठरावीक उद्योजकांचे तब्बल अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. जगात पेट्रोलचे भाव घसरत असताना भारतात मात्र मोदी सरकार ते वाढवतच चालले आहे.
मोदी यांच्या प्रसिद्धीच्या मार्केटिंगचा खर्च काही उद्योगतीच करीत आहेत आणि त्याचा फायदा त्या उद्योगपतींना झाला आहे, अशी टीका करून ते म्हणाले की, आपण पंतप्रधान नसून देशाचे चौकीदार आहोत, असे मोदी सांगतात, पण ते चौकीदार नसून, फायदा झालेल्या उद्योगपतींचे भागीदार आहेत. मोदी एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींना अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसतात आणि त्याच वेळी चीनी सैनिक मात्र डोकलाममध्ये घुसतात, हे जनतेने पाहिले आहे.
पंतप्रधानांनी अचानक एका रात्री नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि त्याचा सर्वाधिक फटका गरिबांनाच बसला, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, कामगार, गरीब लोकांचे जीवन रोजच्या रोज मिळणाºया वेतनावर चालते. त्यांनाच मोदींनी धक्का दिला. सुरतमधील कामगारांनी नोटाबंदीमुळे आम्ही अडचणीत आल्याचे सांगितले, पण मोदींना त्याचे काहीच वाटत नाही. अर्थात, मोदींना गरिबांशी देणेघेणे नाही. त्यांना काळजी केवळ सूटबूटवाल्यांचीच असते. मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांना काही करून सत्ता हवी आहे. सत्ता गेली, तर आपले काय होईल, अशी भीती त्यांना वाटते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
>राफेल खरेदीबाबत खोटी माहिती दिली
मोदी सरकारने या विमानांसाठी हजार कोटींहून अधिक रुपये वाढवून दिले. या राफेलशी एका भारतीय उद्योगपतीचाही संबंध आहे, पण या कराराची माहिती गुप्ततेच्या कारणास्तव द्यायला सरकार तयार नाही. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलणे झाले, तेव्हा करार गुप्त नसल्याचे त्यांनी सांगितले, पण गुप्ततेचे कारण पुढे करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान मोदी कराराची माहितीच द्यायला तयार नाहीत, असा आरोप केला. संरक्षणमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
> सगळेच जुमला स्ट्राइकचे बळी
मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइक नव्हे, तर जुमला स्ट्राइक करीत सुटले आहे. तरुण, बेरोजगार, शेतकरी, सर्वसामान्य असे सारेच जण मोदींच्या जुमला स्ट्राइकचे बळी आहेत, असा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींचा पहिला जुमला होता, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा. त्यातील एक पैसाही मिळाला नाही. आणखी एक जुमला दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचा. प्रत्यक्षात तर ४ लाख लोकांनाच रोजगार मिळाला. आता पंतप्रधान जिथे जातात, तिथे तरुणांना ‘पकोडे तळा, पकोडे विका’ असे ते सांगत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे काही उद्योगपतींशी असलेले जवळचे संबंध सर्वज्ञात आहेत. मोदींमुळे या उद्योगपतींना ४५ हजार कोटींचा फायदा झाला आहे. ते ठरावीक उद्योगपतींनाच मदत का करतात, हे लोकांना समजणे गरजेचे आहे.
>संघ चालवत आहे सरकार : खर्गे
लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकार रा.स्व. संघाच्या विचारांवर चालत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने कामकाज करते, अशी टीका करून ते म्हणाले की, लोकपाल नियुक्तीसाठी लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला बोलाविण्याची दुरुस्ती सरकारने कायद्यात मुद्दामच केली नाही. ठराव स्वीकारून सर्वांना बोलण्यास पुरेसा वेळ दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्यावर सुमित्रा महाजन यांनी तीन-चार वर्षांत पहिल्यांदाच तुम्ही धन्यवाद दिले, असे उत्तर हसतच दिले.
>पंतप्रधान मोदींचे सिंडिकेट मोठे
तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी मोदी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. मोदी पश्चिम बंगालमध्ये आले की, तृणमूल काँग्रेसमधील सिंडिकेटविषयी हमखास बोलतात, पण त्यात तथ्य नाही. वस्तुस्थिती आहे की, देशात आज आहे मोदी सिंडिकेट. नीरव मोदी, ललित मोदी व बडा (नरेंद्र) मोदी हे सारे मिळून आज संपूर्ण देशाला लुटत आहेत.
>शेतकरी, व्यापारी बेजार : मुलायमसिंह
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी मोदी सरकारच्या काळात देशातील सर्वसामान्य लोक दु:खी आहेत, शेतकरी, तरुण, बेरोजगार व लहान व्यापारी संतापलेले आहेत, असा आरोप केला. या सरकारने बेरोजगारांना सरकारने रोजगार मिळवून दिला नाही, व्यापाºयांना व शेतकºयांना अधिकच त्रासात टाकले आहे, अशा वातावरणात देश कधीही संपन्न होणार नाही. अमेरिकेत शेती व शेतकºयांना प्राधान्य दिले जाते, पण इथे सरकारच्या साह्याविना शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकारने ही स्थिती आणली आहे, असे ते म्हणाले.
>थेट आरोप नको : महाजन
ठरावावरील चर्चेत विरोधक व सत्ताधारी एकमेकांवर थेट आरोप करू लागल्याने, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व अयोग्य शब्दांचा वापर करू नका, अशी विनंती केली. आरोप करायचे असतील, तर त्याची आधी नोटीस द्यावी लागते, याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्याचे उत्तर देण्याची संधी सीतारामन यांना दिली जाईल.
>भाजपा देशभर ताकदवान - राजनाथ सिंह
गृहमंत्री राजनाथ सिंह ठरावाला विरोध करताना म्हणाले की, आज भाजपा संपूर्ण भारतातील ताकदवान पक्ष बनला आहे. सर्वाधिक राज्यांत आमची व मित्रपक्षांची सरकारे आहेत. त्यामुळे काँग्रेसला अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष कमकुवत असून, ते आमचा मुकाबलाच करू शकणार नाहीत. भाजपाविरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, नेतृत्व कोण करणार, याविषयी त्यांचे आपापसात पटत नाही. नेतृत्वाचा प्रश्न येताच, यांचे ऐक्याचे प्रयत्न लगेच फिसकटतात.
>लोकांचा विश्वास उडत चालला - तारिक अन्वर
राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर यांनी मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. पोटनिवडणुकांतील भाजपाच्या पराभवांचा उल्लेख करून ते म्हणाले की, लोकांचा भाजपावरील विश्वास उडत चालला आहे. ‘अच्छे दिन’ व ‘सबका साथ सबका विकास’ अशा घोषणा करणाºया मोदींच्या काळात काही घराण्यांचाच विकास झाला. देशातील बुद्धिजीवी वर्ग आज भीतीच्या छायेखाली आहे. महागाईमुळे सामान्य बेजार आहेत. गरिबांचा बँकांतील पैसा घेऊ न काही लोक परदेशात पळाले, तरीही मोदी सरकार यावर काहीच करायला तयार नाही.
>तो करार काँग्रेसच्या काळातील - सीतारामन
राहुल गांधी यांनी राफेल खरेदीबाबत थेट आरोप केल्यामुळे त्यांच्यानंतर लगेचच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, भारत व फ्रान्स यांच्यात २५ जानेवारी २00८ रोजीच गुप्ततेचा करार झाला होता. तेव्हा काँग्रेसचे ए. के. अँथनी हेच संरक्षणमंत्री होते. हे सांगताना सीतारामन यांनी फ्रान्सशी झालेल्या कराराची आणि त्यावरील अँथनी यांच्या स्वाक्षरीची प्रतही सभागृहाला दाखविली. आपण खोटे बोलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने आपण हा खुलासा करीत आहोत, असे त्या म्हणाल्या.
>आंध्र प्रदेशवर अन्याय केला - जयदेव गल्ला
तेलगू देसमचे जयदेव गल्ला यांनी चर्चेची सुरुवात केली. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर राज्याला मदत करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते, पण एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आंध्रसाठी विशेष दर्जा वा विशेष आर्थिक मदत दिली नाही. सरदार पटेल व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जितकी मदत सरकारने दिली, तितकीही आंध्रला दिली नाही. त्या पुतळ्यांना अर्थसाह्यास आमचा विरोध नाही. मात्र, मोदी सरकारने आणि आधीच्या काँग्रेसनेही आंध्र प्रदेशवर अन्यायच केला आहे, असे जयदेव गल्ला म्हणाले.